
स्थैर्य, फलटण, दि. ३० ऑक्टोबर : फलटण येथील साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ‘राज्यस्तरीय माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार २०२५’ साठी लेखक आणि कवींकडून पुस्तके मागवण्यात आली आहेत.
१ नोव्हेंबर २०२३ ते १ नोव्हेंबर २०२५ या दोन वर्षांच्या कालावधीत प्रकाशित झालेली पुस्तके या पुरस्कारासाठी पात्र असतील. यामध्ये कादंबरी, कथासंग्रह, काव्यसंग्रह, चरित्र, आत्मचरित्र, नाटक, संपादित संग्रह, दिवाळी अंक, ललित लेख संग्रह, संशोधनपर लेखन आणि शाळा-महाविद्यालयीन वार्षिक विशेषांक अशा साहित्य प्रकारांचा समावेश आहे.
साहित्य पाठवण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर २०२५ असून, परीक्षण समितीमार्फत निवड झालेल्या दर्जेदार पुस्तकांच्या लेखकांना नोव्हेंबर महिन्यात दहिवडी (ता. माण) येथे होणाऱ्या ‘माणदेशी युवा स्पंदन साहित्य संमेलना’मध्ये गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष ताराचंद्र आवळे यांनी दिली. परीक्षण समितीचा निर्णय अंतिम राहील व पुस्तके परत पाठवली जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इच्छुकांनी आपले साहित्य कवयित्री सौ. सुरेखा ताराचंद्र आवळे, कोणार्क रेसिडेन्सी, सदनिका क्र. ६, गोळीबार मैदान, लक्ष्मीनगर, फलटण (पिन ४१५५२३) या पत्त्यावर समक्ष, कुरिअर किंवा पोस्टाने पाठवावे.
