
स्थैर्य, फलटण, दि. १० ऑक्टोबर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘विद्यार्थी प्रवेश दिन’ या दिवशी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत, तालुक्यातील जावली केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्णेवाडी येथील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी राजनंदिनी विठ्ठल पडर हिने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: एक महान विचारवंत’ या विषयावर आपल्या ओघवत्या शैलीत मनोगत व्यक्त करत राजनंदिनीने हे यश संपादन केले. राजनंदिनी एक उत्तम वक्ता म्हणून प्रसिद्ध असून, तिने यापूर्वीही अनेक शासकीय व खाजगी वक्तृत्व स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली होती, तो दिवस (७ नोव्हेंबर) राज्यभरात ‘विद्यार्थी प्रवेश दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच औचित्याने या स्पर्धांचे आयोजन केले जाते.
या यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिस नायकवडी, फलटण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शरणय्या मठपती, विस्ताराधिकारी दारासिंग निकाळजे, जावली केंद्राच्या केंद्रप्रमुख संगिता मगर, मुख्याध्यापक शामराव निंबाळकर आणि वर्गशिक्षक अविनाश सुतार यांच्यासह विविध मान्यवरांनी राजनंदिनीचे अभिनंदन व कौतुक केले आहे.