स्थैर्य, फलटण दि. ३ : फलटण पंढरपूर मार्गावर फलटण येथील महाविद्यालयीन युवतीचा विडणी गावच्या हद्दीत अपघाती मृत्यू झाला आहे. आपला वाढदिवस घरी साजरा करुन केकसह मैत्रिणीकडे जात असतानाच तीच्यावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पर्णवी तथा जान्हवी संजय काकडे वय 21 मंगळवार पेठ फलटण असे या दुर्दैवी मृत तरुणीचे नाव आहे.
फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्णवी उर्फ जान्हवी संजय काकडे (वय – 21, रा.मंगळवार पेठ फलटण) ही युवती आज दुपारी 2 च्या सुमारास फलटणहुन विडणीकडे आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या मैञीणीकडे दुचाकीवरून जात होती. त्यावेळी विडणी गावच्या हद्दीतील कोकरेवस्ती येथे तीच्या दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या ट्रक्टर नंबर एमएच.45.एस.3372 ने ओव्हरटेक करताना मागील ट्रॉलीची धडक बसली यामध्ये जान्हवी संजय काकडे ही गंभीर जखमी झाली. जान्हवी हिस रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले परंतू उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला. या अपघातातील ट्रक्टर चालक हा अपघातानंतर घटनास्थळावरून ट्रक्टर घेऊन फरार झाला असून या अपघाताचा तपास पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख करीत आहेत.
जान्हवी काकडे हीने एमएस्सी ग्रीची पदवी घेतली होती. तीने बीएस्सी ग्री फलटणच्या शेती महाविद्यालयात तर एमएस्सी पदवीचे शिक्षण तिने पुणे येथे पूर्ण केले होते. सध्या ती यूपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. तिने नुकतीच यूपीएससीची प्रिलियम परीक्षा देखील दिली होती.
दरम्यान जान्हवीचा मित्र परिवार मोठा होता. 31 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता तीचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला होता. दुपार पर्यंत अनेकांनी सोशल मिडीयावर तीला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. परंतू वाढदिवसा दिवशीच तिचा मृत्यू झाल्याने शुभेच्छांचा वर्षाव केलेल्यांना जान्हवीस श्रध्दांजली वाहण्याची दुर्दैवी वेळ नातलग व मित्रपरिवावर आली त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.