मुंबईच्या आझाद मैदानावर फलटणच्या मराठा बांधवांचा एल्गार; जोरदार पावसातही सरकारला दिला इशारा


मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला अभूतपूर्व पाठिंबा; ‘आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही’चा निर्धार

स्थैर्य, मुंबई, दि. २९ ऑगस्ट : मराठा आरक्षणाचे संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ऐतिहासिक फलटण नगरीतील हजारो मराठा बांधव आज मुंबईच्या आझाद मैदानावर एकवटले. मुसळधार पाऊस, वाहतूक कोंडी आणि अनेक अडथळ्यांची पर्वा न करता, ‘आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही’ असा खणखणीत इशारा फलटणकरांनी राज्य सरकारला दिला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘आरक्षण आमच्या हक्काचे’ या घोषणांनी आझाद मैदान परिसर दणाणून गेला होता.

मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आझाद मैदानावर आपल्या उपोषणाला सुरुवात केली. त्यांना पाठिंबा देण्यासाठी फलटण तालुक्यातील हजारो मराठा आंदोलक सकाळपासूनच मैदानावर दाखल झाले होते. त्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन आपला जाहीर पाठिंबा दिला आणि त्यांच्यासोबत शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

फलटण तालुक्यात मराठा क्रांती मोर्चाच्या ५० शाखांच्या माध्यमातून बांधलेली मजबूत सामाजिक एकजूट आज मुंबईत दिसून आली. राजकीय मतभेद बाजूला सारून संपूर्ण तालुका जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. अंतरवाली सराटी असो किंवा मुंबई, प्रत्येक आंदोलनात फलटणच्या तरुणांनी आणि मराठा बांधवांनी अग्रभागी राहून लढा दिला आहे, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले.

मुंबईकडे येताना प्रचंड वाहतूक कोंडी आणि अनेक ठिकाणी पोलिसांच्या अडवणुकीला सामोरे जावे लागले, तरीही फलटणकरांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. मुसळधार पावसात भगवे झेंडे फडकवत, हजारो बांधव आपल्या हक्कासाठी आवाज बुलंद करत होते. या अभूतपूर्व गर्दीने आणि निर्धाराने शासनावर मोठा दबाव निर्माण केला आहे.


Back to top button
Don`t copy text!