दैनिक स्थैर्य | दि. 1 डिसेंबर 2023 | फलटण | अलीकडील काळात वाचन संस्कृती वाढीस लागावी म्हणून वेगवेगळ्या संस्था विविध उपक्रम राबवून लोक चळवळ उभी करीत आहेत. यातून वाचन, लेखन संस्कृती वाढीस लागेल असे वाटते. जोपर्यंत लेखक, कवी मनापासून संवेदनशील होत नाही तोपर्यंत समाजाचे प्रश्न समाज मनापर्यंत पोहोचणार नाहीत. फलटणचा साहित्यिक संवाद ऊर्जा व प्रेरणा देणारा आहे. या साहित्यिक संवादातून लेखनास प्रेरणा मिळते असे मत सुधीर इंगळे यांनी नाना नानी पार्क फलटण येथे साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण व वन विभाग फलटण यांनी आयोजित केलेल्या साहित्यिक संवाद या कार्यक्रमात व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे,संयोजक माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, प्रा.विक्रम आपटे, लेखक महादेव गुंजवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुधीर इंगळे पुढे म्हणाले की माणसाने स्वतःवर प्रेम करताना निसर्ग व साहित्य यावरही तेवढेच प्रेम केले पाहिजे. निसर्ग आपणास ऑक्सिजन देतो तर साहित्य आपणास जगण्याची उमेद देते. फलटणचा साहित्यिक संवाद वाचन, लेखन चळवळ बनत आहे.
यावेळी लेखिका सौ. सुलेखा शिंदे यांनी साहित्यिकांची दिवाळी दिवाळी अंक, कवी प्रमोद जगताप यांनी गझल, प्रा. विक्रम आपटे यांनी कसली ही लागण, अस्मिता खोपडे यांनी प्रगतीचा प्रारंभ ही कविता, महादेव गुंजवटे यांनी सांगा कोणी ही कविता, प्रा. अनंत डोईफोडे यांनी जे सुचलं ते लिहिलं, प्रा.विनायक ननावरे यांनी कथा व स्वानुभव, कोरडे साहेब यांनी चिंतन, मनन व वाचन छंद याचे सादरीकरण केले.
संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले व खुला साहित्यिक संवाद याविषयी माहिती दिली. ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे यांनी काय वाचावे व काय वाचू नये हे सांगून मेंढका ही कादंबरी सर्वाना भेट दिली व पुढील साहित्यिक संवाद यासाठी मेंढका याविषयी चर्चा होईल हे सांगून आभार मानले. यावेळी साहित्यप्रेमी विक्रम भांडवलकर, नितीन मदने, सचिन भांडवलकर तसेच साहित्य रसिक श्रोत्यांची प्रमुख उपस्थिती होती.