
स्थैर्य, फलटण, दि. 24 ऑक्टोबर : लायन्स क्लब फलटण संचलित, माळजाई मंदिर व उद्यान समितीने आयोजित केलेल्या ‘किल्ले महोत्सव २०२५‘ ला फलटणकरांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. अत्यंत कमी वेळेत नियोजन करूनही समितीने यशस्वीपणे हा महोत्सव उभा केला असून, दिवाळीच्या सुट्टीत बच्चेकंपनीसह संपूर्ण कुटुंब या महोत्सवाला भेट देऊन इतिहासाला उजाळा देत आहेत.
माळजाई मंदिर उद्यान परिसरात आयोजित या महोत्सवात विविध गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. पारंपरिक वेश परिधान करून आजी–आजोबांपासून नातवंडांपर्यंत सर्वजण या महोत्सवाचा आनंद घेत आहेत. किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहताना आणि त्यांचा इतिहास जाणून घेताना प्रत्येकाचा सहज अर्धा ते पाऊण तास कसा निघून जातो, हे कळत नसल्याचे चित्र आहे. सायंकाळी सात वाजता सुरू होणारा हा महोत्सव पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी कायम असते. लोकांचा ओघ इतका असतो की, रात्री अकरा वाजता लोकांना विनंती करून उद्या येण्याचे सांगून प्रवेशद्वार बंद करावे लागत आहे.
सुरुवातीला हा महोत्सव यशस्वी होईल की नाही, अशी शंका समिती सदस्यांच्या मनात होती. मात्र, महेश गरवालीया आणि स्वीकार मेहता यांनी पुढाकार घेतला आणि समितीचे चेअरमन प्रमोद आण्णा निंबाळकर यांनी त्यांना खंबीर साथ दिली. लायन्स आय हॉस्पिटलचे प्रमुख अर्जुनराव घाडगे यांचेही मोलाचे सहकार्य या महोत्सवाला लाभले आहे. उद्यान समितीने बनवलेल्या प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती विशेष आकर्षण ठरत असून, त्याच्या निर्मितीसाठी जितेश (टिनू) गरवालीया आणि विशाल बोबडे यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे.
या महोत्सवाला मिळत असलेला प्रतिसाद केवळ अविश्वसनीय आहे. लोकांच्या सहभागाशिवाय कोणताही कार्यक्रम यशस्वी होत नाही, याची प्रचिती यातून येत असल्याचे समिती सदस्य दिलीप शिंदे यांनी सांगितले. हा महोत्सव घराघरात पोहोचवण्यात फलटणमधील प्रिंट आणि सोशल मीडियाच्या पत्रकारांचा सिंहाचा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले. ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता आणि बेडकेहाळ सर यांच्या मार्गदर्शनाबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या निमित्ताने शिंदे यांनी तमाम शिवप्रेमींच्या भावना व्यक्त करताना, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात एक मोठे स्मारक उभारण्याऐवजी सरकारने दुर्लक्षित गडकिल्ल्यांचे नूतनीकरण करून त्यांचे पर्यटन केंद्रात रूपांतर करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. महाराजांच्या नावाने होणाऱ्या राजकारणावरही त्यांनी खंत व्यक्त केली. हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून त्यांनी आपल्या भावनांना विराम दिला.

