स्थैर्य, फलटण दि.३ : गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तूत ‘चांडाळ चौकडीच्या करामती’ ही धम्माल कॉमेडी वेबसिरीज अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय प्रसिद्ध झाली आहे. या मालिकेतील बाळासाहेब, रामभाऊ आणि सुभाषराव ही तीन पात्रे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेली आहेत. वेबसिरीजबरोबरच काही मराठी चित्रपटांमध्येही काम केलेले हे कलाकार प्रसिद्धीच्या झोतात असतानादेखील त्यांच्या वागण्यातील साधेपणा व आपुलकी पाहून फलटणचे पत्रकार चांगलेच भारावले.
येथील पत्रकार नसीर शिकलगार, बाळासाहेब ननावरे, किरण बोळे व प्रसन्न रुद्रभटे यांनी नुकताच फलटण तालुक्यातील कांबळेश्वर गावाचा दौरा केला. प्रवासादरम्यानच्या चर्चेनंतर हा दौरा आटोपून ही मंडळी शेजारच्याच पण बारामती तालुक्यात येणार्या कांबळेश्वर गावातील ‘चांडाळ चौकडीच्या करामती’ या वेबसिरीजमधील कलाकारांना भेटण्यासाठी गेली. त्यावेळी या मालिकेचे मार्गदर्शक व युवा नेते करणभैय्या खलाटे, मालिकेचे निर्माते सुभाषराव मदने (मालिकेतील पात्र तंटामुक्ती अध्यक्ष सुभाषराव) , दिग्दर्शक रामदास जगताप (मालिकेतील पात्र रामभाऊ), दिग्दर्शक भरत शिंदे (मालिकेतील पात्र बाळासाहेब), निर्मिती प्रमुख संजय खलाटे (मालिकेतील पात्र संजू ग्रामपंचायत सदस्य) यांची करणभैय्या खलाटे यांच्या निवासस्थानी भेट झाली.
भेटी दरम्यान तब्बल दोन तास या कलाकारांसमवेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा झाल्या. यावेळी सर्वच पत्रकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून आकाशाला गवसणी घालणार्या व पाय जमिनीवर असणार्या या कलाकारांची आपुलकी व साधेपणाचे आवर्जून कौतुक केले. पत्रकारांसमवेत झालेल्या मनमोकळ्या गप्पांनंतर मालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे खास निमंत्रणही सर्व कलाकारांनी पत्रकारांना दिले.