दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
मूळच्या फलटणच्या माहेरवाशीण असणार्या व सध्या कुर्डूवाडीच्या सासरवाशीण असलेल्या प्राजक्ता प्रफुल्ल जोशी यांनी उभारलेल्या ‘श्री फुडस’ची दखल घेऊन युवा महाराष्ट्र फाउंडेशनच्यावतीने प्राजक्ता जोशी यांना लघुउद्योगातील ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार-२०२४’ प्रदान करण्यात आला.
प्राजक्ता प्रफुल जोशी या फलटणच्या मुधोजी महाविद्यालयातून निवृत्त झालेले श्री. अनिल कुलकर्णी व कमला निंबकर बालभवन प्राथमिक शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. अनिता अनिल कुलकर्णी यांच्या द्वितीय कन्या असून त्यांनी आपल्या कर्तृत्वाने ‘श्री फुड्स’च्या माध्यमातून आपला नावलौकीक निर्माण केला आहे.
कुर्डूवाडीसारख्या ग्रामीण भागात श्री फुड्सच्या संचालिका प्राजक्ता कुलकर्णी-जोशी यांनी २०१८ साली घरगुती अल्पोपहार तयार करून पुरवठा करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या पदार्थांमुळे ‘श्री फुड्स’ हे अल्पकाळात नावारूपाला आले.
कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये सर्वत्र व्यवसायाला बंदी आल्यावर प्राजक्ता कुलकर्णी – जोशी यांनी कोरोनोचे नियम पालन करून संधीचा फायदा उचलून अल्पदरात उत्कृष्ट पदार्थाचा पुरवठा सुरू ठेवला होता. अल्पोपहाराबरोबरच दिवाळीचे खमंग पदार्थ, जेवणाचे डबे, इन्स्टंट फूड मटेरियल आदी मागणीनुसार व्यवसायात वाढ करत गेल्या. पती प्रफुल्ल व मुलांनी हातभार लावला.
प्राजक्ता जोशी यांनी चिकाटीने केलेल्या परिश्रमाची दखल पुण्याच्या युवा महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने त्यांना सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे आई-वडील, शिक्षक व कुटुंबिय यांनी व मित्रपरिवाराने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.