
स्थैर्य, फलटण, दि. २६ सप्टेंबर : फलटण शहरातील श्रीमंत सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, बुधवार पेठने यंदा ‘देवीचा दरबार’ आणि ‘श्री स्वामी समर्थ’ यांसारखे आकर्षक देखावे सादर केले असून, हे देखावे पाहण्यासाठी नागरिक विक्रमी गर्दी करत आहेत. मात्र, या मंडळाचे खरे वैशिष्ट्य त्यांच्या देखाव्यांपेक्षाही त्यांच्या आगळ्यावेगळ्या कार्यपद्धतीत आहे. संपूर्ण फलटणमध्ये कोणाकडूनही वर्गणी न मागणारे हे मंडळ म्हणून ओळखले जाते.
या मंडळाचा संपूर्ण खर्च हा बुधवार पेठेतील महिलांच्या वर्षभराच्या बचतीतून केला जातो. परिसरातील महिला रोज त्यांच्या ऐपतीप्रमाणे दहा, वीस किंवा शंभर रुपये बाजूला काढून ठेवतात आणि हा जमवलेला निधी वर्षातून एकदा देवीच्या उत्सवासाठी स्वेच्छेने खर्च करतात. महिलांच्या या स्वावलंबी वृत्तीमुळे हा उत्सव खऱ्या अर्थाने ‘सार्वजनिक’ ठरला असून, त्यांनी इतरांपुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे.
मंडळातर्फे केवळ नऊ दिवसांचा उत्सवच नाही, तर वर्षभर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. यामध्ये रक्तदान शिबिर, नवरात्रीत नऊ दिवस उपवासाच्या पदार्थांचे वाटप, महिला व मुलांसाठी संगीत खुर्ची, ‘होम मिनिस्टर’ आणि इतर मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमध्ये पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसेही ठेवली जातात.
उत्तम नियोजन, आकर्षक देखावे आणि महिलांच्या सक्रिय सहभागातून चालवल्या जाणाऱ्या या मंडळाच्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.