दैनिक स्थैर्य | दि. ०९ नोव्हेंबर २०२१ | फलटण | अरण्यऋषी श्री.मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस (५ नोव्हेंबर) ते पक्षीतज्ञ स्व. डॉ.सलीम अली यांची जयंती (१२ नोव्हेंबर) हा काळ पक्षी सप्ताह म्हणून साजरा होत आहे.
गतवर्षी या पक्षी सप्ताहास शासन स्तरावरून मान्यता मिळाल्याने पक्षी संवर्धन आणि प्रबोधनास चालना मिळणार आहे.
आपल्या महाराष्ट्राला समृद्ध असे पक्षी वैभव लाभले आहे. प्रत्येक प्रजातीचा अधिवास हा वेगवेगळा असतो.आणि या अधिवासात जगण्यासाठी पक्ष्यांनी स्वतःच्या जीवनशैलीमध्ये योग्य बदल करून घेतलेले असतात.यामध्ये काही प्रदेशनिष्ठ, काही स्थलांतरित आणि स्थानिक प्रजातींचा समावेश होतो.
आपला परिसर तसा माळरानाचा, आणि कमी पर्जन्याचा, त्यामुळे आपल्याकडील पक्षी संपदासुद्धा तितकीच विशेषत्वाने बहरलेली आहे, स्थानिक आणि स्थलांतरित असे १४० हुन अधिक प्रजातींचे पक्षी फलटण शहर आणि परिसरात आढळून येतात, गत काही वर्षांपासून होत असलेले जलसंधारण आणि पोषक वातावरण यामुळे हिवाळ्यामध्ये स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणावर आगमन होत असते. यामध्ये पळस मैना ( Rosy Starling) , रंगीत करकोचा (Painted Stork) , चमचा पक्षी(Euresian Spoonbill), चक्रवाक (Ruddy Shelduck), चक्रांग (Common Teal ), भुवई ( Garganey) , थापट्या (Nothern Shoveler), कृष्ण थिरथिरा (Black Redstart ), पांढुरका भोवत्या ( Pallid Harrier) , कालशीर्ष भारीट(Black Headed Bunting ), राखाडी मानेचा भारीट ( Grey Necked Bunting) , काळ्या शेपटीचा पंकज (Black Tailed Godwit) , कंठेरी चिखल्या (Little Ringed Plover ), कमळपक्षी (Pheasant Tailed Jacana ) इ. यासारख्या अनेक प्रजाती आपल्या भागात येत असतात.
पक्षी संवर्धनामध्ये आपण काय करू शकतो??
१) वृक्षारोपण करताना देशी आणि स्थानिक प्रजातींची झाडे लावावीत.
२)एकाच प्रकारची झाडे न लावता, फळझाडे, फुलझाडे, वृक्ष, वेली अशी विविधता ठेवावी.
३) उन्हाळ्यामध्ये घरासमोर , अंगणात, शेतामध्ये पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे.
४) एखादा जखमी पक्षी आढळला, तर पक्षीमित्रांशी किंवा वनविभागामध्ये संपर्क साधा.
प्रा. मंदार पाटसकर
पक्षी निरीक्षक, फलटण.