दैनिक स्थैर्य | दि. २८ ऑगस्ट २०२३ | फलटण |
के. बी. कंपनीच्या मदतीने सेंद्रीय शेतीतील हरितक्रांती व निर्यातवृद्धी साकारणार असल्याचे प्रतिपादन पंजाबचे कृषीमंत्री गुरदीपसिंग खुडिया यांनी केले आहे.
केमिकल रेसिड्यू फ्री (रासायनिक अवशेषमुक्त) तांदूळ व विषमुक्त शेतमाल निर्यातवाढीसाठी पंजाबच्या कृषीमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या के. बी. कंपनीस भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
कृषीमंत्री खुडिया म्हणाले की, शेतकरी बांधवांना सेंद्रीय शेतीविषयक सखोल ज्ञान व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करत उद्याच्या उज्ज्वल भविष्याची मशाल हाती घेत, कर्करोगासारख्या अंधःकारावर मात करून आपल्या मातीवर प्रेम करण्याचा संदेश देणारी आणि या मातीमधून सेंद्रिय शेतमाल पिकविण्यासाठी तसेच निर्यातक्षम व भरघोस उत्पादन मिळवण्याची जादूई संजीवनीरूपी वनस्पतीजन्य अर्कावर आधारित सेंद्रिय किटकनाशके व खतांची निर्मिती करणारी भारतातील सर्वात पहिली व अग्रगण्य कंपनी म्हणजेच फलटण येथील के. बी. बायो ऑरगॅनिक्स कंपनी आहे.
केमिकल रेसिड्यू फ्री तांदूळ व गहू उत्पादन करणे ही सध्या पंजाबमधील खूप मोठी समस्या बनली आहे व याच समस्येवर खात्रीशीर उपाय मिळवण्यासाठी पंजाब राज्याचे कृषीमंत्री गुरुदीप सिंग खुडिया तसेच जलालाबादचे विधायक जगदीप कंबोज गोल्डी, कृषी सहसंचालक डॉ. राज कुमार, डॉ. गुरुदेव सिंग, डॉ जसविंदर सिंग, सुरींदर सिंग व त्यांच्या चमूने शुक्रवार, दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजी फलटण येथील के. बी. एक्सपोर्ट व के. बी. बायो ऑरगॅनिक्स या कंपन्यांना भेट दिली आहे.
या भेटीदरम्यान सर्व युनिट्सची त्यांनी सखोल पाहणी केली असून तेथील प्रयोगशाळा व संशोधन प्रक्रियेमध्ये कंपनीने केलेले कामकाज पाहून अचंबित झाले आहेत. कीटकनाशकांचा पर्याय मानवजातीसाठी उपलब्ध करून देत एक महत्त्वाची भूमिका तुम्ही निभावत आहात, जी अतिशय उल्लेखनीय असून शेतकर्यांना तुम्ही अंध:काराकडून प्रकाशाकडे घेऊन जात आहात. कर्करोगाशी सामना करण्याची ताकद आणि परकीय चलन निर्माण करण्याची हिंमत तुम्ही शेतकर्यांना देत आहात, असे त्यांनी कंपनीचे डायरेक्टर श्री. सचिन यादव यांच्याशी बोलताना सांगितले.
यावेळी के. बी. बायो ऑरगॅनिक्स कंपनीच्या अत्याधुनिक कडूनिंबापासून बनविण्यात येणार्या ‘अॅझाडिरिक्टिन’ या कीटकनाशकाच्या अत्याधुनिक प्लांटचे पंजाबचे कृषीमंत्री गुरदीप सिंग खुडिया यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सातारा जिल्हा कृषी अधीक्षक सौ. भाग्यश्री फरांदे उपस्थित होत्या.