दैनिक स्थैर्य । दिनांक 06 जुलै 2021 । फलटण । भुयारी गटार योजनेच्या कामासाठी गल्लोगल्ली करण्यात आलेल्या खोदकामामुळे फलटण शहरातील झालेल्या रस्त्यांच्या दुरावस्थेला फलटणकर त्रस्त झाले असून सुमारे दीड ते दोन वर्षांपासून रेंगाळलेल्या कामांमुळे पालिकेच्या कामकाजाच्या विरोधात फलटणकरांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
शहर स्वच्छतेच्या व विकासाच्यादृष्टीने महत्त्वाची असलेल्या भुयारी गटार योजनेचे कामकाज फलटण शहरात सुमारे दीड ते दोन वर्षांपासून सुरु आहे. या योजनेचे काम करत असताना भुयारी गटार योजनेची सांडपाणी संकलित करणारी पाइपलाइन संपूर्ण शहरातील रस्त्यांच्या खालून गेलेली आहे. यासाठी सर्व रस्त्यांच्या मधोमध खोदकाम करण्यात आले. त्यामुळे सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. या खोदकामाच्या ठिकाणी रस्त्यांची तात्पुरती मलमपट्टी करताना मुरुम टाकण्यात आला असून त्यामुळे दररोज छोटे – मोठे अपघात घडत आहेत. शिवाय पादचार्यांनाही चालताना मोठी कसरत करावी लागत आहे. या कामासाठी शहरातील रहिवासी वस्त्यांमधून उचकटण्यात आलेल्या रस्त्यांमुळे घरोघरी धुळीचा त्रासही वाढला आहे. पावसाळा सुरु झाल्यामुळे किरकोळ पावसानंतरही चिखलाचे साम्राज्य होत असून यामुळे आरोग्याचा प्रश्नही उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सदरचे रेंगाळळेले काम तात्काळ पूर्ण करुन ज्या ठिकाणी भुयारी गटाराच्या पाईपलाईनची जोडणी झालेली आहे त्याठिकाणी तात्काळ रस्ते डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.