दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२२ । फलटण । आषाढी वारीसाठी आळंदीहुन पंढरपूरकडे निघालेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहोळा काल (बुधवार) रोजी सातारा जिल्ह्यात पोहोचला असून आगामी ६ दिवस सोहोळा सातारा जिल्ह्यात वास्तव्यास असून त्यापैकी ४ दिवस सोहोळा फलटण तालुक्यात विसावणार आहे.
फलटणकरांना माऊलींची प्रतिक्षा
शेकडो वर्षे या भागातून जाणाऱ्या या सोहळ्याचे फलटणकर नेहमीच मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने स्वागत करतात, सोहोऴयातील वारकरी भाविकांना येथील वास्तव्यात नागरी सुविधा देण्याबरोबर त्यांना उत्तम मिष्टान्न भोजन देण्यासाठी फलटणकरांमध्ये अक्षरशः चढाओढ लागते, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहोळा २ वर्षांनंतर येत असल्याने स्वागत व अन्नदानासाठी सर्वजण मोठी तयारी करुन माऊलींची प्रतिक्षा करताना दिसत आहेत.
प्रशासनाने संपूर्ण व्यवस्था केली
शासन प्रशासन पातळीवर नेहमी प्रमाणे महसूल, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा विभाग, पोलिस, पंचायत समिती आणि नगर परिषद प्रशासन तालुक्यातील तरडगाव, फलटण, बरड पालखी तळ, उभे रिंगण आणि माऊलींच्या सकाळ व दुपारच्या विसाव्याची ठिकाणे, पालखी मार्ग वगैरेंच्या स्वच्छता व अन्य सुविधांसाठी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उप विभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी तथा प्रशासक डॉ. सौ. अमिता गावडे पवार, नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन यंत्रणा गेला सुमारे महिनाभर नियोजन पूर्वक प्रयत्नशील असताना जिल्हाधिकारी शेखर सिंह व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सतत आढावा घेऊन कामातील प्रगती तपासून संबंधीत यंत्रणांना आवश्यक सूचना केल्या आहेत. आता जवळ पास सर्व कामे पूर्णत्वाच्या अंतीम टप्प्यात असून प्रशासन यंत्रणा माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचे दिसून येते.
उभ्या रिंगण सोहोऴयाच्या जागेची व्यवस्था पूर्ण
सोहोऴयाच्या आळंदी ते पंढरपूर या वाटचालीतील पहिले उभे रिंगण तरडगाव प्रवेशापूर्वी होते, सदर ठिकाणी पालखी महामार्गाचे रुंदीकरण सुरु असल्याने रस्ता रुंदीकरण भरावाचे काम अपूर्ण अवस्थेत होते त्याबाबत संबंधीत यंत्रणेला सूचना देवून उभ्या रिंगण सोहोळ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
तरडगाव पालखी तळ आणि गावातील पालखी मार्गाचे काम पूर्ण
फलटण तालुक्यात सोहोऴयाचा पहिला मुक्काम माळकरी भाविकांची संख्या मोठी असलेल्या तरडगाव नगरीत होत असून आ. दिपकराव चव्हाण, लोकनियुक्त सरपंच सौ. जयश्री चव्हाण, उप सरपंच प्रशांत गायकवाड व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी शासन यंत्रणेच्या माध्यमातून, गावातील विविध तरुण मंडळे, भजनी मंडळे, भाविक आणि ग्रामस्थांच्या मदतीने संपूर्ण व्यवस्था उत्तम केली आहे.
गावातून जाणाऱ्या पालखी मार्गाची दुरुस्ती, त्यावरील झाडेझुडपे काढून स्वच्छता करण्यात आली असून पालखी तळावर उभारण्यात आलेल्या वीज वितरण कंपनीच्या खांब व वीज वाहक तारांमुळे होणारा अडथळा दूर करण्यासाठी सदर खांब काढण्यात आले आहेत, तसेच पालखी तळावरील काटेरी झुडपे काढून संपूर्ण तळ जेसीबीच्या सहाय्याने एक लेव्हल करण्यात आला आहे, पोलिस यंत्रणेने उभारलेला टेहळणी स्टेज (उंच खांब) पालखी रथास अडथळा ठरत असल्याने तो अन्यत्र हलविण्यात आला आहे.
तरडगाव पालखी तळावर बंद असलेले हायमास्ट दिव्यांची संख्या वाढवून ते सर्व कार्यान्वित करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केली असून संपूर्ण पालखी तळावर लख्ख प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे.
तरडगाव पालखी तळावरील चिखल होणाऱ्या ठिकाणी मुरुम टाकून चिखल होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी पालखी राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेवर सोपविण्यात आली असून त्यांचे काम सुरु असल्याचे दिसून आले आहे.
सुरवडी येथील विसाव्याचे ठिकाणची व्यवस्था
सोहोळा तरडगाव येथून फलटण कडे मार्गस्थ असताना सुरवडी येथील विसाव्याच्या ठिकाणाकडे व तेथून परत येणाऱ्या मार्गावर रस्ता (रॅम्प) करण्याची व्यवस्था तसेच पुढील वर्षापर्यंत रस्ता रुंदीकरणात जाणारे पालखी चबुतरा व इमारत पुन्हा उभारण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेने (NHAI) स्वीकारली आहे.
विडणी येथील सकाळचा विसावा
फलटण येथील २ दिवसांच्या मुक्कामानंतर सोहोळा बरड मुक्कामाकडे दि. ३ रोजी सकाळी मार्गस्थ होईल. विडणी येथे सकाळच्या विसाव्यासाठी थांबणार असलेल्या विसाव्याच्या ठिकाणाकडे जाणारा व येणारा रस्ता आणि रॅम्प तयार करण्याची तसेच पालखी राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण काम सुरु असल्याने झालेल्या खोदाई मुळे विडणी येथे अरुंद झालेला रस्ता रुंद करुन त्याची दुरुस्तीची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे.
पिंप्रद येथील दुपारचे भोजन आणि विसावा
विसाव्यासाठी सोहोळा थांबणार असलेल्या विसाव्याच्या ठिकाणाकडे जाणारा व येणारा रस्ता आणि रॅम्प तयार करण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेने (NHAI) स्वीकारली असून त्यांचे काम अंतीम टप्प्यात पूर्णत्वाकडे सुरु आहे.
बरड पालखी तळ आणि गावातील पालखी मार्ग दुरुस्ती
बरड पालखी तळालगत असलेल्या छोट्या टेकडीचे सपाटीकरण करुन पालखी तळाचे विस्तारीकरण ग्रामपंचायतीने पूर्ण केले असून अन्य व्यवस्था पूर्ण केली आहे. बरड पालखी तळावर पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सध्याचे फिडींग पॉईंट वाढवून पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी पंचायत समिती पाणी पुरवठा विभाग कार्यरत असून यावेळी पुरेसा पाणी पुरवठा करण्याची ग्वाही देण्यात आली आहे.
राजुरी ग्रामपंचायत कार्यरत
बरड येथून सोहोळा नातेपुते कडे मार्गस्थ झाल्यानंतर साधू बुवाचा ओढा येथील विसाव्याच्या ठिकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती आणि रस्त्याकडेची झाडे झुडपे काढून संपूर्ण स्वच्छता करण्याचे काम राजुरी ग्रामपंचायत यंत्रणेने सुरु केले आहे.
विसावा ठिकाणी सपाटीकरण आणि स्वच्छता करण्यात येत आहे.
वीज वितरण कंपनी तालुक्यातील संपूर्ण वीज व्यवस्था पाहणार
फलटण तालुक्यात पालखी सोहोळा पोहोचल्या पासून येथील वास्तव्या दरम्यान अखंडित वीज पुरवठा, दुरुस्ती, देखभाल वगैरे जबाबदारी वीज वितरण कंपनी फलटण विभागाने स्वीकारली आहे. पालखी महामार्ग आणि मुक्काम ठिकाणे येथील वीजेचे खांब, वीज वाहक तारा, ट्रान्सफॉर्मर, फ्युज बॉक्स वगैरेंची तपासणी करुन कोठेही धोकादायक परिस्थिती राहणार नाही आणि दुर्घटना घडणार नाही याची दक्षता वीज वितरण कंपनी कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली त्यांची संपूर्ण यंत्रणा घेत आहे.
सोहोळा वास्तव्या दरम्यान भारनियमन न करता अखंडित वीज पुरवठा सुरु राहील असे नियोजन करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सोहोळा मुक्कामाच्या ठिकाणी आणि शौचालयांच्या ठिकाणी तात्पुरता वीज पुरवठा करण्याची जबाबदारीही कार्यकारी अभियंता यांचेवर देण्यात आली आहे.
पालखी सोहोळा मार्गस्थ असताना पर्यायी मार्ग
फलटण तालुक्यात पालखी सोहोळा वास्तव्यास असताना वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचे नियोजन जबाबदारी सातारा आर. टी. ओ. सातारा यांच्यावर देण्यात आली असून पर्यायी मार्गाची दुरुस्ती करुन सदर रस्ता जड वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहतुकी योग्य करण्याची जबाबदारी राज्य शासन सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषद बांधकाम खात्यावर सोपविण्यात आली आहे.
आरोग्य आणि वैद्यकिय सुविधा
पालखी सोहोळा मार्गावर आणि सोहोळा मुक्कामाच्या ठिकाणी विविध प्रा. आरोग्य केंद्र, उप केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय यांचे मार्फत पुरेशी वैद्यकिय उपचार सुविधा जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याशिवाय फिरत्या पथकांमार्फत वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी वैद्यकिय सेवा सुविधा उपलब्ध करुन देतील तसेच या सर्व ठिकाणी आवश्यक औषधे आणि साधने, सुविधा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा
फलटण आणि खंडाळा तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना सोहोळा सातारा जिल्ह्यात असताना एखादी दुर्घटना घडली किंवा एखादा अनुचित प्रकार घडला तर काय करावे यासाठी विशेष कार्यशाळा घेऊन खास प्रशिक्षण देण्यात आले आहे.
यशदा पुणेचे महासंचालक कर्नल (निवृत्त) विश्वास सुपनेकर आणि जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी देविदास ताम्हाणे यांनी या कार्यशाळेस स्वतः उपस्थित राहुन मार्गदर्शन केले आहे.