दैनिक स्थैर्य । दि. १८ डिसेंबर २०२१ । फलटण । सांजवातीची वेळ… दिव्यांचा मंद प्रकाश… झोंबणारा गारवा… प्रेक्षागृहातील उत्सुकता… यमन कल्यानच्या षडजाची दीर्घ गंधर्व लकेर … संवादिनीची सुरैल साथ … तबल्यावर थिरकणारा तालनाद … नि … नेमक्या समेवर मिळालेली उस्फूर्त दाद…! हे चित्र होते सांजसमयी रंगलेल्या शास्त्रीय गायनाच्या ‘सुरमयी’ मैफिलीचे. या मैफिलीत फलटणकर अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन गेले होते. निमित्त होते श्रीमंत उदयसिंहराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत विक्रमसिंहराजे नाईक निंबाळकर यांच्या जयंती दिनाचे. श्रीमंत मालोजीराजे स्मृति प्रतिष्ठान द्वारा या औचित्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सादरकर्त्या होत्या सवाई गंधर्व फेम, आकाशवाणी, दूरदर्शन व आंतरराष्ट्रीय ‘अ’ श्रेणी शास्त्रीय गायिका ‘सुरमयी’ सानिया पाटणकर, पुणे.शास्त्रीय गायनाची ही बहारदार मैफिल सोमवार दि.१३ डिसेंबर रोजी ड्रॉईंग हाॅल, मुधोजी हायस्कूल येथे निवडक रसिकांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
‘येरी जोगो के..’ या यमन रागातील विलंबित बंदिशीने मैफिलीला प्रारंभ झाला. नंतर दृत बंदिश ‘ सखी एरी आली पिया बिन.. ‘ आणि शेवटी अतीदृत सरगम गीत गाऊन सानिया पाटणकर यांनी आपल्या शास्त्रीय गायकीच्या विविध पैलूंचा अविष्कार सादर केला. विशेषतः त्यांच्या तान, आलाप व सरगम गायकीतील हुकूमतीला रसिक प्रेक्षकांनी टाळ्या व वाहवाची ऊस्फूर्त दाद दिली. निलेश रणदिवे तबला तर अभिनय रवंदे यांच्या संवादिनी वादनाने मैफिलीत चांगलाच रंग भरला.
उत्तरार्धात ‘युवती मना..’, ‘माझे जीवन गाणे..’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा..’ व ‘उगवला चंद्र पुनवेचा.. ‘ ही नाट्यगीते सादर करून त्यांनी रसिकांच्या पुर्वस्मृती जागृत केल्या. नंतर ‘अबीर गुलाल … ‘ हा अंभग, ‘याद पिया की आये …’ ही ठुमरी आणि लतादीदी व पंडित भिमसेनजी यांच्या आवडत्या ‘बाजे मुरालिया बाजे..’ या लोकप्रिय भैरवीने मैफिलीची सांगता झाली. सुमारे दोन तास चाललेल्या या बहारदार श्रवणीय मैफिलीत रसिक तल्लीन होऊन गेले होते. कोरोना काळात मनाला उत्साह देणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी अनोखी मेजवानीच ठरला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख कलाकार सानिया पाटणकर यांच्या शुभहस्ते प्रतिमांचे पूजन झाले. त्यानंतर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते गायक व सहकलाकांराचा सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे सचिव प्राचार्य विश्वासराव देशमुख, सदस्य अरंविद निकम, शिवाजीराव घोरपडे, अर्जून रूपनवर, प्रा. डाॅ. संजय दीक्षित व डाॅ.निलिमा दाते उपस्थित होते.
प्रा. डाॅ. अशोक शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कलाकारांचा परिचय करून दिला. तर प्रा. निलम देशमुख यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. फलटण मधील विविध क्षेत्रातील निवडक जाणकार रसिकांनी या मैफिलीचा मनसोक्त आनंद लुटला.