दैनिक स्थैर्य | दि. ०२ डिसेंबर २०२४ | कोळकी | मुगुटराव कदम | संस्थान काळापासून सुरु असलेली फलटण येथील प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रा आज सोमवार, दि. 2 डिसेंबर रोजी हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत परंपरागत पद्धतीने मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाली. हजारो भक्तगण प्रभूरामचंद्रांच्या भक्तीरसात चिंब भिजले.
नाईक निंबाळकर घराण्यातील साध्वी श्रीमंत सगुणामाता आईसाहेब यांनी सुमारे 250 वर्षापूर्वी रथयात्रेची सुरु केलेली परंपरा आजही सुरु आहे. प्रतिवर्षी मार्गशिर्ष शुद्ध प्रतिपदा म्हणजेच देवदिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीरामाची सजविलेल्या रथातून नगरप्रदक्षिणा होते. आज सोमवार, दि. 2 डिसेंबर रोजी सकाळी 8:30 चे सुमारास सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते रथाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रभू श्रीराम – सीतामातेच्या मूर्ती रथामध्ये ठेवून त्यांची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. विविधरंगी पुष्पमाला, फळे, ऊसाच्या मोळ्या बांधून , विविधरंगी निशाणे लावून हा रथ नगरप्रदिक्षणेसाठी मार्गस्थ झशला. याप्रसंगी राजघराण्यातील श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ.मिथिलाराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्यासह श्रीरामचे संचालक शरदराव रणवरे, लक्ष्मणराव नाईक निंबाळकर, मानकरी भाविक उपस्थित होते. उपस्थित भाविकांनी राममुर्तीवर फुलांची उधळण केली. राम सीतेच्या मूर्ती मंदीरातून बाहेर आणल्यानंतर रथात सेवेकर्यांनी आसनस्थ केल्यानंतर आरती करण्यात आली. त्यानंतर रामराया वाद्यांच्या गजरात नगरप्रदक्षिणेसाठी सकाळी 8:35 वाजता निघाले. रथापुढे ढोलताशाचा गजर चालू होता. श्रीराम मंदीरापासून नगरप्रदक्षिणेसाठी निघालेला रथ शिंपी गल्लीतून रविवार पेठ मार्गे उघड्या मारुती मंदीरापर्यंत गेला. तेथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे महावीर स्तंभामार्गे उपळेकर महाराज समाधीमंदीर मार्गे दुपारी 12 वाजता महात्मा फुले चौकात रथ पोचला. त्यानंतर मारवाडपेठ मार्गे रंगारी महादेव मंदीर येथून रथ बाणगंगा नदीपात्राकडे गेल्यानंतर तिथे शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली होती. मलठणमधील हरिबुवा महाराज मंदीर, पाचबत्ती चौक, रविवार पेठ तालीम मार्गे रामरथ शिवाजी चौकात पोहचला. दरम्यान रथ प्रदक्षिणेच्या या मार्गावर ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने आलेल्या अबालवृद्धांनी श्रीरामांचे शहरात ठिकठिकाणी मोठ्या भक्तीभावाने दर्शन घेतले. काही नागरिकांनी सडा, रांगोळ्या घालून श्री प्रभू रामाचे दर्शन घेतले. चौकात काही ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.
या रथोत्सवासाठी बारामती, इंदापूर, खंडाळा, माण, खटाव, पुरंदर, कोरेगांव तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक आले होते. नोकरी व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई आणि अन्य शहरात असलेले स्थानिक रहिवासी सहकुटूंब रथयात्रेसाठी आणि प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी आले होते. रामरथ मंदीरात पोचल्यावर आरती होऊन रामरथ यात्रेची सांगता झाली.
राम रथोत्सवाच्या निमित्ताने मोठी यात्रा भरते. त्यामध्ये मेवामिठाईची दुकाने, लहान मुलांच्या खेळण्यांची दुकाने, स्त्रियांची विविध आभुषणे, बांगड्या, पर्स, संसारउपयोगी साहित्य, कपडे, लहान मुलांची खेळणी आदी वस्तूंची रेलचेल बाजारपेठेत होती. मुधोजी हायस्कूल ते गजानन चौकापर्यंत दुतर्फा या दुकानांच्या रांगा होत्या. दुपारी दोन वाजता रस्त्यावर खूपच गर्दी पहायला मिळाली. बसस्थानकानजिक असलेल्या यशवंतराव चव्हाण हायस्कूलचे प्रांगणानजिक तसेच डी. एड. चौकाचे उत्तरेकडील मोकळ्या जागेत विद्युतवर चालणारी मनोरंजानाची व लहान मुलांचे आकर्षण ठरणारी साधनेही या यात्रेत दाखल झालेली आहेत. जागेच्या अभावामुळे शहरातील शिवाजी वाचनालयाचे परिसरातही खेळणी दाखल झाली आहेत.
दरम्यान सकाळी 6:30 वाजल्यापासून श्रीराम मंदीरात दर्शनासाठी रांगा लावून भाविकांनी गर्दी केली होती. मुख्य मूर्ती रथामध्ये आसनस्थ करताना मंदीर परिसर तसेच शिवाजी वाचनालयापर्यंत हजारो भाविक उपस्थित होते.