
फलटण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस. बंडखोरांमुळे दोन्ही गटांचे टेंशन वाढले. विडणीत १६ उमेदवार असल्याने तिथे लढत कशी होणार?. वाचा सविस्तर अपडेट…
स्थैर्य, फलटण, दि. २३ जानेवारी: फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीतील सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक दिवस आज (दि. २३) उजाडला आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालयात काय घडामोडी घडतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. छाननीनंतर जिल्हा परिषदेसाठी ५८ आणि पंचायत समितीसाठी ११० उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, आज दुपारी ३ वाजेपर्यंत हे चित्र बदलणार असून, बंडखोर माघार घेणार की शड्डू ठोकून उभे राहणार? यावरच पुढील लढतींचे भवितव्य अवलंबून आहे.
विडणी गणाकडे सर्वांचे लक्ष
१६ पैकी किती उरणार? या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा विडणी पंचायत समिती गणाची होत आहे. येथे एकाच जागेसाठी तब्बल १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या गणात बंडखोरांची संख्या मोठी असल्याने मतांचे विभाजन टाळण्यासाठी दोन्ही गटांच्या (खासदार व राजे गट) नेत्यांनी मध्यरात्रीपर्यंत फोडाफोडी आणि मनधरणीचे सत्र राबवल्याचे समजते. आज दुपारी ३ वाजेपर्यंत यातील किती उमेदवार माघार घेतात, यावर येथील लढत सरळ होणार की बहुरंगी, हे स्पष्ट होईल.
बंडखोरी रोखण्याचे आव्हान
भाजपा व राष्ट्रवादी युती आणि शिवसेना राजे गट या दोन्ही बाजूने अनेक ठिकाणी अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. हे बंडखोर उमेदवार पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचे गणित बिघडवू शकतात. त्यामुळे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी बंडखोरांची समजूत काढण्यासाठी आपली यंत्रणा कामाला लावली आहे.
‘वंचित’ आणि ‘बसपा’ मुळे चुरस वाढणार?
काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टीने (BSP) उमेदवार उभे केले आहेत. हे उमेदवार अर्ज कायम ठेवतात की माघार घेतात, यावरही अनेक गटांमधील विजयाचे गणित अवलंबून असेल.
आज दुपारी ३ वाजता अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने ‘खासदार गट वि. राजे गट’ या लढतीचे चित्र स्पष्ट होईल.
