
फलटण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. विडणी गणात तब्बल १६ उमेदवार रिंगणात! कोळकी, साखवरवाडीत हायव्होल्टेज लढती; वंचित आणि बसपाच्या एन्ट्रीने मतांचे गणित बिघडणार? वाचा सविस्तर रिपोर्ट…
स्थैर्य, फलटण, दि. 22 जानेवारी : सातारा जिल्हा परिषद आणि फलटण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (दि. २१) फलटण तहसील कार्यालयात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आता उमेदवारांचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले असून, तालुक्यात ‘काटे की टक्कर’ होणार असल्याचे निश्चित झाले आहे. अंतिम यादीनुसार भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांसह अपक्षांनीही मोठ्या संख्येने दंड थोपटल्याने ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.
विडणीत तब्बल १६ उमेदवार; कोळकीतही गर्दी
या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा विडणी पंचायत समिती गणाची (क्रमांक १२) होत आहे. या एकाच गणातून तब्बल १६ उमेदवारांनी नशीब आजमावण्याचा निर्णय घेतल्याने येथे मोठी चुरस निर्माण झाली आहे. तसेच, तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोळकी जिल्हा परिषद गटात (क्रमांक ९) देखील उमेदवारांची मोठी गर्दी दिसून येत आहे. उमेदवारांच्या या प्रचंड संख्येमुळे मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणावर होणार असून, त्याचा फटका कोणाला बसणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
प्रमुख रणांगणे तापली
फलटणच्या राजकारणाचे केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या साखरवाडी, बरड, कोळकी आणि वाठार निंबाळकर या गटांमध्ये तुल्यबळ लढती होणार आहेत. वाठार निंबाळकर गणात उमेदवारांचे पक्ष आणि चिन्हे निश्चित झाली असून, तिथेही दोन्ही गटांत निकराची झुंज पाहायला मिळणार आहे.
बंडखोरी आणि ‘वंचित’चा फॅक्टर
आज समोर आलेल्या चित्रानुसार, महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिकीट न मिळालेल्या नाराजांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच ‘वंचित बहुजन आघाडी’ आणि ‘बहुजन समाज पार्टी’ (BSP) ने देखील काही महत्त्वाच्या ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. या पक्षांच्या एन्ट्रीमुळे मतांचे गणित बिघडणार असून, याचा फायदा-तोटा कोणाला होणार, यावर आता राजकीय खलबते सुरू झाली आहेत.
आता अर्जांची छाननी आणि माघारीची मुदत संपल्यानंतरच खऱ्या अर्थाने लढतीचे अंतिम स्वरूप समोर येईल, मात्र तूर्तास फलटणच्या रणांगणात उमेदवारांचा ‘महापूर’ आल्याचे चित्र आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार, गट आणि गणनिहाय उमेदवारांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे:
