फलटण: पालिका झाली, आता रणधुमाळी झेडपीची; दोन्ही गट सज्ज


फलटण नगरपरिषदेनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. खासदार आणि राजे गटाने मोर्चेबांधणी सुरू केली असून बैठका व दौऱ्यांचा धडाका लावला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०२ जानेवारी : फलटण नगरपरिषदेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत ३५ वर्षांची सत्ता उलथवून लावत खासदार गटाने ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर आता राजकीय वर्तुळाचे लक्ष आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकडे लागले आहे. पालिकेचा निकाल लागताच खासदार गट आणि राजे गटातील दिग्गज नेतेमंडळींनी आता ग्रामीण भागातील आपले वर्चस्व राखण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कंबर कसली आहे.

खासदार गटाची जोरदार मोर्चेबांधणी

नगरपरिषदेतील विजयामुळे आत्मविश्वास वाढलेल्या खासदार गटाने ग्रामीण भागातही आपली ताकद वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर आणि जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सक्रिय होत नियोजनावर भर दिला आहे. इच्छुकांच्या मुलाखती, ग्रामीण भागातील दौरे आणि जाहीर पक्षप्रवेशाचा धडाका त्यांनी लावला आहे.

राजे गटाचे ‘मायक्रो प्लॅनिंग’

दुसरीकडे, आपले गड शाबूत ठेवण्यासाठी राजे गटही कामाला लागला आहे. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीसाठी ‘मायक्रो प्लॅनिंग’ सुरू केले आहे. पंचायत समिती गणनिहाय बैठकांचे सत्र सुरू करून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम राजे गटाकडून सुरू झाले आहे.


Back to top button
Don`t copy text!