
फलटण तालुक्यात पुन्हा राजकीय रणधुमाळी! सुप्रीम कोर्टाचे १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका घेण्याचे निर्देश. फलटणमधील ८ गट आणि १६ गणांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार. नगरपरिषदेतील सत्तांतरानंतर आता लक्ष ग्रामीण राजकारणाकडे.
स्थैर्य, फलटण, दि. 12 जानेवारी : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीचा धुराळा खाली बसतो न बसतो तोच आता पुन्हा एकदा तालुक्याच्या राजकारणात मोठा ‘धुराळा’ उडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्याबाबत खुद्द सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) निर्देश दिले असून, १५ फेब्रुवारीपर्यंत या निवडणुका घेण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे पुढील काही तासांत किंवा दिवसांत कधीही आचारसंहिता (Code of Conduct) जाहीर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या बातमीने फलटणमधील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, इच्छुकांनी पुन्हा एकदा ‘गुडघ्याला बाशिंग’ बांधून तयारी सुरू केली आहे.
सुप्रीम कोर्टाचा ‘अल्टिमेटम’; प्रशासकीय हालचालींना वेग
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक दिवसांपासून प्रलंबित होत्या. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत उरकण्याचे निर्देश दिल्याने निवडणूक आयोगाच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. अचानक आलेल्या या आदेशामुळे प्रस्थापित नेत्यांची धाकधूक वाढली आहे, तर नवीन चेहऱ्यांना संधीचे वेध लागले आहेत. कधीही निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागू शकते, त्यामुळे उद्घाटने आणि भूमिपूजनांच्या कामांनाही आता ‘ब्रेक’ लागणार आहे.
फलटणचे राजकीय गणित: ८ गट आणि १६ गण!
फलटण तालुक्याचा विचार करता, जिल्हा परिषदेचे (ZP) एकूण ८ गट आणि पंचायत समितीचे (PS) १६ गण आहेत. हे ८ गट आणि १६ गण म्हणजे तालुक्याच्या ग्रामीण राजकारणाचा ‘कणा’ मानले जातात. आगामी काळात या जागांवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये काट्याची टक्कर होणार आहे. विशेषतः आरक्षणाच्या सोडतीनंतर अनेक समीकरणे बदलली असून, कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगरपरिषदेनंतर आता ‘ग्रामीण’मध्ये ‘काटे की टक्कर’
काही दिवसांपूर्वीच फलटण नगरपरिषदेत मोठे सत्तांतर झाले. शहरी भागात घडलेल्या या राजकीय भूकंपानंतर आता ग्रामीण भागात काय होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नगरपरिषदेत गमावलेली सत्ता ग्रामीण भागात भरून काढण्यासाठी राजे गट ताकदीने उतरणार आहे, तर खासदार गट आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ विकासाची नसून ‘अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची’ ठरणार आहे, हे नक्की!
आता ‘धुराळा’ नक्की उडणार आणि गुलाल कोण उधळणार, याचा फैसला लवकरच होणार आहे.
