
फलटणमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागले असून लवकरच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस, रासप आणि सह्याद्री कदम यांची भूमिका निर्णायक ठरणार असून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 04 जानेवारी : फलटण नगरपालिका निवडणुकीचा धुराळा खाली बसतो ना बसतो तोच आता तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. आगामी काही दिवसांत निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला असून, राष्ट्रीय काँग्रेस आणि महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) नक्की कोणाच्या बाजूने उभे राहणार? यावरच सत्तेची गणिते अवलंबून असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या दोन पक्षांच्या भूमिकेकडे लागले आहे.
काँग्रेसची ‘युती’ की ‘स्वबळ’?
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत फलटणमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत घरोबा केला होता. या युतीचा फायदा होत काँग्रेसचा एक नगरसेवक निवडूनही आला. मात्र, आता ग्रामीण भागाचे राजकारण वेगळे असल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पुन्हा शिंदे गटाच्या शिवसेनेसोबतच युती ठेवणार की वेगळी, स्वतंत्र भूमिका घेणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काँग्रेसच्या निर्णयावर अनेक गटांचे भवितव्य अवलंबून असेल.
‘रासप’ची ताकद कोणाच्या पारड्यात?
दुसरीकडे, माजी मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची (रासप) भूमिकाही तितकीच महत्त्वाची मानली जात आहे. फलटण तालुक्याच्या पूर्व भागात ‘रासप’ला मानणारा मोठा वर्ग आणि हक्काची व्होटबँक आहे. जानकरांचा पक्ष ज्याच्या बाजूने उभा राहील, त्याचे पारडे जड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, अद्याप रासपच्या स्थानिक नेत्यांनी किंवा वरिष्ठांनी आपली पाने उघडलेली नसल्याने विरोधकांसह सत्ताधाऱ्यांमध्ये संभ्रम आहे.
सह्याद्री कदम गेमचेंजर?
या निवडणुकीत चर्चा आहे ती माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांचे सुपुत्र सह्याद्री कदम यांची. त्यांची राजकीय भूमिका म्हणजे ‘कधी ऊन, कधी सावली’ अशीच राहिली आहे. लोकसभा निवडणुकीत ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत निष्ठेने उभे होते. मात्र, नगरपालिका निवडणुकीच्या सुरुवातीला ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत दिसले. पण प्रचाराचा नारळ फुटताच त्यांनी अचानक युती सोडून आपल्या समर्थक अपक्ष उमेदवारांचा जोमाने प्रचार केला.
विशेष म्हणजे, त्यांनी उभे केलेले अपक्ष उमेदवार जरी निवडून आले नसले, तरी त्यांनी घेतलेल्या मतांमुळे त्या प्रभागातील प्रस्थापित नेत्यांची गणिते बिघडली होती. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत सह्याद्री कदम कोणासोबत जाणार की पुन्हा ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेत प्रस्थापितांना धक्का देणार? याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागून आहे.
एकंदरीतच, आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच फलटणचे राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस, रासप आणि सह्याद्री कदम यांच्या भूमिकेवरच आगामी सत्तेचा लोलक फिरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
