फलटण शहरात आठवडा बाजाराची नवीन व्यवस्था : काय आहे बदल?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०३ जानेवारी २०२५ | फलटण | फलटण शहरातील आठवडा बाजाराच्या व्यवस्थापनाबाबत नगरपरिषदेने एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. या पत्रकातून शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत आठवडा बाजार भरविण्याच्या निर्णयाबाबत माहिती दिली गेली आहे, ज्यामुळे व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे.

फलटण शहरातील महात्मा फुले चौक ते श्रीमंत मालोजीराजे पुतळा ते शासकीय अधिकार गृह ते केंजळे स्मारक ते गिरवी नाका या परिसरामध्ये दर रविवारी भरविण्यात येणारा आठवडा बाजार हा आता शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर भरविण्यात येत आहे. यासाठी नगर पालिका कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

“फलटण शहरातील मध्यवर्ती बाजार पेठ येथे भरविण्यात येणाऱ्या आठवडी बाजाराच्या नियोजनासाठी नगर पालिका कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच वाहतूकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे नियोजन केलेले आहे,” असे फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सांगितले.

आठवडा बाजार भरविण्यात येणार असलेल्या ठिकाणांची यादी खालीलप्रमाणे आहे:

  1. गजानन चौक (मधुमालती इमारत) ते उमाजी नाईक चौक
  2. उमाजी नाईक चौक (ज्ञानेश्वर मंदिराच्या मागील बाजूस) ते डेक्कन चौक
  3. उमाजी नाईक चौक ते मेटकरी गल्ली
  4. मेटकरी गल्ली ते शिवशक्ती चौक (परिवार साडी सेंटर)
  5. शिवशक्ती चौक ते अप्सरा साडी सेंटर (रविवार पेठ)
  6. शिवशक्ती चौक ते नरसिंह चौक
  7. नरसिंह चौक ते शिवानी गिफ्ट हाउस

तसेच, क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते छत्रपती शिवाजी महराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बारामती चौक (उपजिल्हा रुग्णालय), आणि इतर काही ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येणार नाही याची माहिती देण्यात आली आहे.

नगरपालिका प्रशासकीय इमारतीच्या समोरील वाहनतळ आणि डेक्कन चौक येथील अशोका हॉटेल शेजारील नगरपालिका मालकीचे वाहनतळ येथे वाहने पार्किंग करण्याची सुविधा निशुल्क करण्यात आलेली आहे.

“सदर आठवडा बाजार हा प्रायोगिक तत्त्वावर शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ या ठिकाणी मागील रविवार पासून भरविण्यात येत असल्यामुळे सर्व नागरिक, शेतकरी व व्यापारी यांनी प्रशासनास सहकार्य करावे,” असे निखिल बाजीराव मोरे यांनी आवाहन केले आहे.

उपरोक्त नमूद केलेल्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येणार नाही अशा ठिकाणी बसल्याचे आढळून आल्यास सदर व्यापारी व शेतकरी यांचे विरुद्ध प्रशासनामार्फत उचित कारवाई करण्यात येईल.


Back to top button
Don`t copy text!