
दैनिक स्थैर्य | दि. 24 फेब्रुवारी 2025 | फलटण | फलटण शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून आठवडी बाजाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर तयार झालेला आहे. प्रत्येक रविवारी भरवला जाणारा आठवडी बाजार हा कोरोना महामारीच्या पूर्वी उमाजी नाईक चौकाला केंद्रस्थानी मानून भरत होता. कोरोना महामारीच्या नंतर माळजाई मंदिराच्या समोर आठवडी बाजार भरू लागला होता. परंतु नगर परिषदेच्या आदेशामुळे पुन्हा आठवडी बाजार हा काही आठवडे उमाजी नाईक चौकाला केंद्रस्थानी मानून भरवला गेला.
या बदलामुळे शेतकरी व भाजी विक्रेत्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे दिसून आले. यामुळे गेल्या आठवडी बाजारापासून शेतकरी व भाजी विक्रेते हे माळजाई मंदिराच्या समोर जाऊन भाजी विक्रीसाठी बसले. त्यांना त्या ठिकाणी बसल्यानंतर पुन्हा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे भाजी विक्रेते स्पष्ट करतात.
काल अर्थात रविवारी झालेल्या आठवडी बाजार हा माळजाई मंदिरासमोर व महावीर स्तंभ ते गजानन चौक या परिसरामध्ये सुद्धा बसला गेला. याबाबत फलटण नगर परिषदेने अद्याप कोणताही निर्णय अथवा आदेश पारित केला नसला तरी सुद्धा शेतकरी व भाजी विक्रेते हे स्वतःहून माळजाई मंदिराच्या समोर व मुधोजी हायस्कूल ते गजानन चौक या परिसरामध्ये बसले होते.
फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी आठवडी बाजाराचा चेंडू फलटण शहर पोलीस स्टेशनकडे टाकला असून त्याबाबत पोलीस स्टेशनकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मुख्याधिकारी यांनी लवकरात लवकर नगरपरिषद व फलटण शहर पोलीस स्टेशन यांची संयुक्त बैठक घेऊन आठवडी बाजाराबाबत आदेश पारित करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
फलटण शहरातील आठवडी बाजाराच्या ठिकाणाच्या बदलामुळे वाहतूकीची समस्या आणि गर्दीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मध्यवर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची दुकाने, घरे असल्यामुळे तसेच अरुंद रस्ते यामुळे आठवडा बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दीचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या समस्यांमुळे शेतकरी व भाजी विक्रेत्यांनी माळजाई मंदिराच्या समोर बाजार भरवण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी शेतकरी व भाजी विक्रते करीत आहेत.
आठवडी बाजाराच्या ठिकाणाच्या निर्णयाची प्रतीक्षा आता संपत आली आहे. शेतकरी व भाजी विक्रेत्यांच्या हिताचा विचार करूनच कोणताही निर्णय घेतला पाहिजे. शहराची सुविधा आणि शेतकरी व भाजी विक्रेत्यांचे हित यांचा समतोल साधणे हे नगरपरिषदेचे प्रमुख काम आहे.