
फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग १० मधील रस्ते विकासकामे रखडल्याचा आरोप करत प्रीतसिंह अमरसिंह खानविलकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली आहे. ठेकेदारावर कारवाईची मागणी.
स्थैर्य, फलटण, दि. 20 जानेवारी : फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मधील रस्ते विकासकामे ठरलेल्या मुदतीत पूर्ण न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते प्रीतसिंह अमरसिंह खानविलकर यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर केली आहे. संबंधित ठेकेदारावर नियमांनुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
प्रभाग १० मधील विविध रस्त्यांची कामे फलटण नगरपरिषद मार्फत ‘व्ही स्क्वेअर कन्स्ट्रक्शन’ या ठेकेदाराला देण्यात आली होती. मात्र, वर्क ऑर्डरची मुदत संपूनही ह. बा. कुलकर्णी ते रवी शिंदे गिरण रस्ता, जय हिंद कोल्ड्रिंक्स ते डॉ. जगताप दवाखाना, परडेकर मठ परिसरातील रस्ते अद्याप अपूर्ण असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, संबंधित ठेकेदाराला तीन वेळा नोटिसा देण्यात आल्या असतानाही कामे पूर्ण करण्यात आलेली नाहीत. असे असताना ठेकेदारावर कारवाई न करता प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप खानविलकर यांनी केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनांचे पालन झाले आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आधीची कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारालाच पुन्हा नवीन निविदेतून काम देण्यात येत असल्याने ‘अनुचित लाभ’ दिला जात असल्याचा संशयही तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रभाग १० मधील रखडलेली सर्व कामे तातडीने सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेस किंवा सार्वजनिक शांततेस धक्का बसल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
