दैनिक स्थैर्य | दि. २० ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत टंचाई आढावा घेण्यात आला. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार शबाना बागवान यांनी फलटण विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अद्ययावतीकरण सुरू झाल्याचे सांगून मतदारांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
या आढावा बैठकीस सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, तालुका कृषी अधिकारी सागर डांगे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, नायब तहसीलदार तुषार देशमुख, महसूल नायब तहसीलदार एन. डी. काळे, निवासी नायब तहसीलदार डॉ. सौ. डी. एस. बोबडे – सावंत, संजय गांधी योजना नायब तहसीलदार डॉ. भक्ती सरवदे, निवडणूक नायब तहसीलदार शबाना बागवान उपस्थित होत्या.
या बैठकीस उपस्थित असलेल्या निवडणूक नायब तहसीलदार शबाना बागवान यांनी २५५ फलटण (अ. जा.) विधानसभा मतदार संघातील मतदार यादी शुद्धीकरण व पुनरिक्षण कामकाज सुरू असल्याचे निदर्शनास आणून देत मतदार यादीतील मयत मतदारांची नावे कमी करणे, ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत ती समाविष्ट करणे, यादीत नाव आहे पण ते चुकीचे असेल तर दुरुस्त करणे, मतदाराचा पत्ता बदलला असेल तर पूर्वीच्या प्रभागातून त्यांचे नाव कमी करुन नवीन प्रभागात समाविष्ट करणे, फोटो नसेल तर तो समाविष्ट करणे किंवा चुकीचा फोटो असेल तर दुरुस्त करुन योग्य फोटो लावणे वगैरे प्रक्रिया सुरु असल्याचे निदर्शनास आणून देत मतदारांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या प्रभागातील बुथवर जाऊन मतदार यादीतील आपले व कुटुंबातील सर्व नावे बरोबर असल्याची खात्री करावी. काही दुरुस्ती असेल तर बुथवर असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांचेकडे योग्य फॉर्म भरुन द्यावा, असे आवाहन निवडणूक नायब तहसीलदार बागवान यांनी यावेळी केले.