
स्थैर्य, सातारा, दि. 5 ऑक्टोबर : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत (लाडका भाऊ योजना) ११ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता कार्यमुक्त केले जात असल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे, याकडे लक्ष वेधण्यासाठी सातारा जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. प्रशिक्षणानंतर शासकीय आस्थापनांमध्ये रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली होती. सुरुवातीला ६ महिन्यांसाठी असलेल्या या योजनेला नंतर ५ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. आता ११ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर राज्यातील १ लाख ३४ हजार प्रशिक्षणार्थींना कार्यमुक्त केले जात आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील सुमारे साडेतीन ते चार हजार तरुणांचा समावेश आहे. प्रशिक्षण पूर्ण होऊनही रोजगार मिळत नसल्याने प्रशिक्षणार्थींमध्ये संतापाचे वातावरण असून, विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत.
याच पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींच्या शिष्टमंडळाने खासदार उदयनराजे भोसले आणि दमयंतीराजे भोसले यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. यावेळी खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या:
- ज्या शासकीय आस्थापनांमध्ये प्रशिक्षण घेतले, त्याच ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार मिळावा.
- चार ते पाच महिन्यांचे थकीत विद्यावेतन (Stipend) तातडीने देण्यात यावे.
- रोजगार मिळाल्यानंतर नियमित वेतन मिळावे.
निवेदन देताना सातारा जिल्हा प्रतिनिधी हिना पानसरे यांच्यासह सर्व तालुक्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये फलटण तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून आकाश गोळे, कराडच्या अश्विनी माने, जावलीच्या सुप्रिया पाडळे, माणचे प्रशांत भोसले आणि कोरेगावच्या रेशमा नलवडे यांचा समावेश होता.