
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण दौऱ्यामुळे १८ डिसेंबरला वाहतूक व्यवस्थेत बदल. पर्यायी मार्ग आणि ‘नो पार्किंग’ झोनची माहिती जाणून घ्या.
स्थैर्य, फलटण, दि. १७ डिसेंबर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा १८ डिसेंबर रोजी फलटण दौरा असून त्यांच्या सभेसाठी शहरात मोठ्या जनसमुदायाची उपस्थिती अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सातारा पोलीस अधीक्षकांनी १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.०० ते दुपारी ३.०० या वेळेत शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल केले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांची फलटण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी ३५ ते ४० हजार नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सभास्थळ हे क्रांतीसिंह नाना पाटील चौकाच्या शेजारी असून, हा रस्ता पंढरपूर, पुणे, दहीवडी आणि बारामतीकडे जाणाऱ्या वाहतुकीचा मुख्य मार्ग आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ अन्वये वाहतूक वळवण्याचे आदेश दिले आहेत.
वाहतुकीतील प्रमुख बदल (पर्यायी मार्ग)
१८ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत खालीलप्रमाणे पर्यायी मार्ग वापरणे बंधनकारक आहे:
-
पंढरपूरकडून लोणंद/पुण्याकडे जाणारी वाहने : श्रीराम कारखाना बायपास रोड → सोमवार पेठ वजन काटा → बारामती पूल → जिंती नाका मार्गे लोणंद व पुण्याकडे जातील.
-
पुणे/लोणंदकडून पंढरपूरकडे जाणारी वाहने : जिंती नाका → बारामती पूल → सोमवार पेठ वजन काटा → श्रीराम कारखाना बायपास रोड → पालखी मार्गाने पंढरपूरकडे जातील.
-
पंढरपूर ते बारामती वाहतूक : श्रीराम कारखाना बायपास रोड → सोमवार पेठ वजन काटा वरून बारामतीकडे.
-
बारामती ते पंढरपूर वाहतूक : सोमवार पेठ वजन काटा → श्रीराम कारखाना बायपास रोड → पालखी मार्गाने.
-
दहीवडी – पुणे/बारामती वाहतूक : दहीवडीवरून पुणे किंवा बारामतीकडे जाणारी आणि येणारी सर्व प्रकारची वाहतूक नियमित मार्गाने सुरू राहील. यात बदल नाही.
हे रस्ते पूर्णपणे बंद राहतील
-
बारामती चौक ते क्रांतीसिंह नाना पाटील चौक : हा संपूर्ण मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छ. शिवाजी महाराज चौक : हा मार्ग सर्व वाहतुकीसाठी बंद असेल.
‘नो पार्किंग’ झोन घोषित सुरक्षेच्या कारणास्तव खालील ठिकाणी वाहने पार्क करण्यास मनाई करण्यात आली आहे:
-
बारामती पूल ते दहीवडी चौक दरम्यानचा रस्ता.
-
छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून चारही बाजूस ५०० मीटर अंतरापर्यंत.
-
व्हीआयपी मार्ग : फलटण विमानतळ – गिरवी नाका – रेस्ट हाऊस – सफाई कामगार कॉलनी कॉर्नर – महात्मा फुले चौक – डेक्कन चौक – रत्तंध चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – छ. शिवाजी महाराज चौक.
सभेमुळे होणारी गर्दी आणि वाहनांची संख्या लक्षात घेता, नागरिकांनी आणि वाहन चालकांनी वरील बदलांची नोंद घ्यावी. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी केले आहे.

