कोविड रुग्णांसाठी फलटणला जम्बो कोव्हीड हॉस्पिटल उभारणार; श्रीमंत रामराजेंचा निर्धार; श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २३ : फलटण शहरासह तालुक्यातील कोविड रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी फलटणमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांनी सुसज्ज असं जम्बो रुग्णालय फलटण येथील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये उभारण्यात येणार आहे. येथे कोरोना बाधित रुग्णांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध राहणार आहेत. कोविड रुग्णांसाठी मोठ्या शहरात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्यासाठी जम्बो हॉस्पिटलची स्थापना या पूर्वीच करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने फलटण येथे जम्बो हॉस्पीटल स्थापन करण्यासाठी विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे विशेष प्रयत्न करीत आहेत. शासन स्तरावरुन तालुक्याच्या ठिकाणी जम्बो हॉस्पीटलची मान्यता ही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे मिळणार आहेत. फलटण तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी जम्बो हॉस्पिटलची स्थापना वखार महामंडळाच्या गोदामामध्ये करण्यात येणार आहे. त्या बाबतचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून लवकरच त्यावर कार्यवाही होईल, अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

फलटण तालुक्यातील वाढत्या कोविड रुग्णांसाठी अतिरिक्त तसंच तातडीची आरोग्य सुविधा निर्माण करणं, त्याशिवाय इतर रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी जम्बो हॉस्पिटलची निर्मिती करण्यात येत आहे. जम्बो हॉस्पिटलच्या निर्मितीमुळे कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांवर उपचार करणंही डॉक्टरांना सोयीचं होईल. फलटण शहरासह तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांना या पार्श्वभूमीवर वखार महामंडळाच्या गोदामामध्ये येत्या काही दिवसांत जम्बो हॉस्पिटल उभारले जाणार आहे. या ठिकाणी 150 बेड्स सह आयसीयू सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहे, असेही सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

फलटण येथे जम्बो कोव्हीड हॉस्पिटल होण्यासाठी विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. त्या वर कार्यवाही करून आगामी काही दिवसांतच फलटण येथे जम्बो कोव्हीड हॉस्पिटल उभे राहून सुरु करण्यात येईल असा विश्वास सुद्धा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी व्यक्त केला.

करोना विषाणूनं बाधित होऊन बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये त्यानंतरही हृदय, फुफ्फुसं, मूत्रपिंडं, मेंदू अशा महत्त्वाच्या अवयवांच्या कार्याशी निगडीत अनेक शारीरिक व्याधी उद्भवत असल्याचं लक्षात आलं आहे. त्यामध्येच ‘म्युकॉरमायकोसिस’ या आजाराचे अनेक रुग्ण गेल्या काही महिन्यांत आढळून आले. वैद्यकीय शास्त्राला पूर्वीपासून ज्ञात असलेला हा आजार ‘ब्लॅक फंगस’ किंवा ‘काळी बुरशी’ या नावानं ओळखला जातो. आजपर्यंत तसा दुर्मिळ असा हा विकार सर्वसामान्य जनतेला परिचित नसल्यानं त्याबाबत एक सर्वव्यापी उत्सुकता आणि अकारण भय निर्माण झालं आहे, ह्या आजराबाबत सुद्धा उपचार होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती या वेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी दिली.


Back to top button
Don`t copy text!