
दैनिक स्थैर्य । दि. १६ जुलै २०२१ । फलटण । ‘‘फलटण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदाच्या माध्यमातून शहरात उत्तमोत्तम नागरी सुविधा देण्याचा आपला प्रयत्न राहणार असून विशेषत: विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षणात फलटणचा दर्जा उंचावण्याचा आपला मानस आहे’’, असे प्रतिपादन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी केले.
फलटण पालिकेचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी नुकतीच ‘लोकजागर’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. सदर भेटीप्रसंगी झालेल्या अनौपचारिक संवादात ते बोलत होते. यावेळी ‘लोकजागर’ चे संस्थापक तथा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, ‘लोकजागर’चे संपादक रोहित वाकडे, भारद्वाज बेडकिहाळ, फलटण पालिकेतील अधिकारी सुरेंद्र काळबेरे उपस्थित होते.
‘‘आपण यापूर्वी कार्यरत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड नगरपंचायतीची स्वच्छ सर्वेक्षणात देशातील टॉप 25 शहरांमध्ये निवड झाली होती. या यशाचे मुख्य कारण म्हणजे तेथील विविध घटकांना स्वच्छतेविषयी प्रोत्साहित करण्यात आपल्याला यश आले होते. त्याच धर्तीवर फलटण शहरात जनजागृतीचे उपक्रम राबवण्याचे नियोजित आहे. यासाठी बचत गट, स्वयंसेवी संस्था, मोठे उद्योग यांच्याशी लवकरच समन्वय साधून शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियान प्रभावीपणे आपण राबवणार असल्याचे’’, यावेळी संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले.
रविंद्र बेडकिहाळ यांनी, ‘‘संजय गायकवाड यांच्यारुपाने फलटण शहराला प्रशासनातील अनुभवी अधिकारी लाभले असल्याने त्यांच्या कारकीर्दीत शहराचा विकास गतिमान होईल.’’ असे सांगून त्यांच्या कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.