दैनिक स्थैर्य | दि. १३ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण तहसील आवारात विनापरवाना लिखाई करणार्या लोकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी फलटण तालुका स्टॅम्प व्हेंडर्स बाँड रायटर्स अँड पिटीशयन रायटर्स संघटना यांनी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र, त्या लोकांविरुद्ध कारवाई न केल्याने ‘काम बंद’ आंदोलन पुकारल्याने लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. याबाबतीत महसूल विभाग ठोस भूमिका घेत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, याबाबत तब्बल पंधरा दिवस होऊन गेले तरी फलटण महसूल विभाग कारवाई करीत नाही, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने याचा अहवाल ९ फेब्रुवारीपर्यंत मुदत देऊन मागूनही कोणतीच ठोस भूमिका घेतली जात नसल्याने फलटण तालुका स्टॅम्प व्हेंडर्स बाँड रायटर्स अँड पिटीशयन रायटर्स संघटना यांनी काम बंद ठेवले असून नागरिकांना स्टॅम्प व तिकिटे मिळत नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. अशा विनापरवाना काम करणार्या लोकांविरुद्ध महसूल विभागाच्या अधिकार्यांनी कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.