
सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समिती निवडणुकीसाठी फलटण तालुक्यात मतदारांचा उदंड प्रतिसाद. सरासरी ७२ टक्के मतदान. सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद. निकालाकडे सर्वांचे लक्ष. वाचा सविस्तर…
स्थैर्य, फलटण, दि. ०७ फेब्रुवारी : सातारा जिल्हा परिषद आणि फलटण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Satara ZP Election 2026) आज सकाळपासून सुरू असलेल्या मतदानाच्या प्रक्रियेची सांगता मोठ्या उत्साहात झाली आहे. फलटण तालुक्यातील मतदारांनी आपला हक्क बजावण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, तालुक्यात सरासरी ७२ टक्के (Average 72% Voting) मतदान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आज सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५४.१७ टक्के मतदान झाले होते, मात्र शेवटच्या दोन तासांत मतदानाचा वेग प्रचंड वाढल्याने अंतिम टप्प्यात ही टक्केवारी ७२ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
उमेदवारांचे भवितव्य पेटीत बंद
या निवडणुकीत ‘राजे गट’ आणि ‘खासदार गट’ यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. आज सायंकाळी ५.३० वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतर आता सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रांमध्ये (EVM/Voting Unit) बंद झाले आहे. आता गणिते आणि आडाखे मांडायला सुरुवात झाली असून, सोमवारी (दि. ०९) होणाऱ्या मतमोजणीकडे आणि निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
शांततेत पार पडली प्रक्रिया
कोणताही अनुचित प्रकार न घडता, प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे आणि पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे संपूर्ण तालुक्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ग्रामीण भागात महिला आणि नवमतदारांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
