
दैनिक स्थैर्य | दि. 03 मार्च 2025 | फलटण | फलटण शहर व तालुक्यासाठी महत्वाचे असणाऱ्या नीरा खोऱ्यातील नीरा – देवधरच्या पाण्यावरून चांगलेच रान पेटले आहे. यामध्ये फलटण तालुक्यातील विद्यमान सत्ताधारी अर्थात खासदार गट व विरोधी असणारे राजे गट आमने – सामने आले आहेत. दोन्ही गटाचे नेते हे एकमेकांवर विविध आरोपांच्या फैरी झाडत आहेत.
यामध्ये सर्वात प्रथम फलटण तालुक्याचे हक्काचे पाणी इतरत्र तालुक्यात जाणार असल्यामुळे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पाणी वाटप संस्था व शेतकऱ्यांची बैठक हि त्यांच्या “लक्ष्मी – विलास” पॅलेस या ठिकाणी घेतली. त्यामध्ये पुणे येथील विधान भवन येथे संपन्न होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत तालुक्यातील पाणी वाटप संस्था व शेतकऱ्यांनी जाण्याचा निर्णय झाला. त्यानुसार शनिवार दि. ०१ मार्च रोजी पुणे येथील विधान भवन येथे संपन्न झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील शेतकरी हे विधानभवनावर धडकले. यावेळी श्रीमंत रामराजे यांना माहिती देताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले कि “फलटण तालुक्याचे हक्काचे असलेले पाणी हे इतरत्र कोणत्याही तालुक्याला देण्याचा प्रस्ताव हा आमच्याकडे नाही. व फलटण तालुक्याचे हक्काचे पाणी आम्ही इतरत्र कोणत्याही तालुक्याला देणार नाही.” या नंतर तालुक्यातील पाणी वाटप संस्थांचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी विधान भवनाच्या बाहेर जल्लोष केला.
याच पाठोपाठ पुणे येथील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी आमदार सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील स्पष्ट केले कि “फलटण तालुक्याचे हक्काचे असलेले एक थेंब पाणी सुद्धा इतर तालुक्याला देण्याचा प्रस्ताव नाही. याबाबत काही जण मुद्दाम जनतेची दिशाभूल करीत आहेत. त्याच वेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले कि “काही जण बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करीत आहे. एका तालुक्याचे पाणी दुसऱ्या तालुक्याला देण्याचा अधिकार हा माझा किंवा कालवा सल्लागार समितीचा नाही. यासोबतच माजी आमदार राम सातपुते यांनी यांनी फलटणचे पाणी माळशिरस येथे देण्याबाबत कोणताही प्रस्ताव दिलेला नाही; फक्त माळशिरस तालुक्यामध्ये असणाऱ्या पाणी पैकी पाणी एका फाट्याला सोडण्याबाबतचे पत्र दिलेले आहे”
त्यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे पत्रकारांशी बोलताना संपूर्ण नीरा खोऱ्यातील धरणे व पाण्याच्या बाबतची सविस्तर माहिती दिली. हि माहिती देत असताना आगामी दीड वर्षांमध्ये फलटण तालुक्यातील एकही गाव ओलिताखाली आल्याशिवाय राहणार नाही. काही लोक तांत्रिक माहिती नसताना मुद्दामून राजकीय स्टंट करीत असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सदरील माहिती दिल्यानंतर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी माहिती देत कृष्णा खोऱ्याची इतंभूत माहिती हि श्रीमंत रामराजे यांना आहे. माजी खासदार हे जी नीरा खोऱ्यातील पाण्याच्याबाबत माहिती सांगत आहेत त्यानुसार त्यांच्या पाण्याच्या विषयी काहीच अभ्यास नसून त्यांच्या ज्ञानाची किव येते असा उपरोधिक टोला लगावत श्रीमंत रामराजे यांनी नीरा खोऱ्यासाठी केलेले प्रयत्न व आताची नीरा खोऱ्यातील पाण्याची परिस्थिती त्यांनी स्पष्ट केली.
या सर्व बाबींचा विचार करता सध्या नीरा खोऱ्यातील पाण्यावरुन उन्हाळ्याच्या सुरवातीलाच फलटणचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसून येत आहे.