फलटण तालुक्याला पावसाने झोडपले; एका दिवसात ४६.४ मिमी पावसाची नोंद


स्थैर्य, फलटण, दि. २७ सप्टेंबर : फलटण शहर व तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज, शनिवार सकाळपर्यंतच्या गेल्या २४ तासांत तालुक्यात तब्बल ४६.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही माहिती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.

या जोरदार पावसामुळे तालुक्यातील सप्टेंबर महिन्याची पावसाची सरासरी ओलांडली गेली आहे. या महिन्यात आतापर्यंत एकूण १७१.५ मिमी पाऊस झाला असून, हा आकडा महिन्याच्या सरासरीच्या (१३८.२ मिमी) १२४.१ टक्के इतका आहे.

मोसमाचा एकूण विचार करता, १ जूनपासून आजपर्यंत फलटण तालुक्यात एकूण ३९५.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा आकडा एकूण मोसमी सरासरीच्या ११०.८ टक्के आहे. यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त असला तरी, गेल्या वर्षीच्या तुलनेत तो कमीच आहे. मागील वर्षी याच तारखेपर्यंत तालुक्यात ५६५.१ मिमी पावसाची नोंद झाली होती.


Back to top button
Don`t copy text!