फलटण तालुक्यातील घरगुती गॅस वितरणाचा दैनंदिन अहवाल तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्याकडून प्रसिद्ध; तालुक्यात ९४ हजार ४१७ गॅस ग्राहक


फलटण तालुक्यातील घरगुती गॅस सिलिंडर वितरणाचा १२ मार्चचा अहवाल तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी प्रसिद्ध केला आहे. तालुक्यात एकूण ९४ हजार ४१७ घरगुती गॅस ग्राहक असून गुरुवारी २२११ सिलिंडरचे वाटप करण्यात आले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 12 मार्च : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस टंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाकडून घरगुती गॅस वितरणावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये आणि वितरणात पारदर्शकता राहावी, याच अनुषंगाने फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी गुरुवारी (दि. १२ मार्च) फलटण तालुक्यातील नऊ घरगुती गॅस (एलपीजी) वितरकांचा अधिकृत दैनंदिन अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार फलटण तालुक्यात एकूण ९४ हजार ४१७ घरगुती गॅस जोडणी धारक असल्याची नोंद समोर आली आहे.

गॅस उपलब्धतेची आणि वितरणाची सद्यस्थिती

तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, फलटण तालुक्यामध्ये एक गॅस जोडणी असलेले ४८ हजार २३७ तर दोन गॅस जोडणी असलेले ४६ हजार १८० असे एकूण ९४ हजार ४१७ ग्राहक आहेत. गुरुवारच्या अहवालानुसार तालुक्यात सर्व गॅस एजन्सीजकडे मिळून प्रारंभाची २ हजार १९६ सिलिंडरची शिल्लक होती. त्यात नव्याने १ हजार ६५६ सिलिंडरची आवक झाल्याने वितरकांकडे एकूण ३ हजार ८५२ सिलिंडर उपलब्ध झाले. यापैकी आज दिवसभरात ४ हजार २९२ ग्राहकांनी गॅसचे बुकिंग केले असून, प्रत्यक्षात २ हजार २११ घरगुती गॅस सिलिंडरचे ग्राहकांना सुरळीत वितरण करण्यात आले आहे. दिवसअखेर तालुक्यात १ हजार ६४१ सिलिंडर शिल्लक राहिले आहेत.

वितरकांवर प्रशासनाचे काटेकोर नियंत्रण

तालुक्यामध्ये एच. डी. लटकर एचपी, सूर्या एचपी, सूर्यतारा एचपी, विक्रम भारत, विघ्नहर्ता भारत, पवार भारत, नंदन तरडगाव, सुदर्शन आसू भारत आणि दुर्वांकुर इंडेन या नऊ गॅस वितरक संस्था कार्यरत आहेत. सद्यस्थितीत व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद असल्याने निर्माण झालेल्या टंचाईच्या वातावरणात सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महसूल प्रशासन खबरदारी घेत आहे. तसेच, घरगुती गॅसचा काळाबाजार किंवा हॉटेल्समध्ये व्यावसायिक वापर टाळला जावा, यासाठी तहसीलदार व पुरवठा विभागाकडून गॅस एजन्सीच्या दैनंदिन साठ्यावर आणि वितरणावर करडी नजर ठेवून दररोज हा अहवाल संकलित केला जात आहे.


Back to top button
Don`t copy text!