फलटण तालुका ‘प्रभावित’ घोषित; जमीन महसूल, वीज बिल माफीसह ५ मोठ्या सवलती लागू


स्थैर्य, फलटण, दि. १ नोव्हेंबर : जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झाल्याने, शासनाने फलटण तालुक्यात ‘प्रभावित’ दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील आपदग्रस्त व बाधित घटकांना पाच मोठ्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाने (महसूल शाखा) याबाबतचे आदेश सर्व तहसीलदारांना दिले आहेत.

शासनाच्या १० ऑक्टोबरच्या निर्णयानंतर, जिल्हाधिकारी कार्यालयाने २८ ऑक्टोबर रोजी हे आदेश काढले. यानुसार, बाधितांना जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जांचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती मिळणार आहे. यासोबतच, तिमाही वीज बिलात माफी आणि इयत्ता १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफी, या सवलतींचाही यात समावेश आहे.

फलटण तालुक्यासोबतच माण आणि खटाव तालुक्यांचाही ‘प्रभावित’ तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच सातारा, कराड, पाटण, कोरेगाव व जावळी हे तालुके ‘अंशतः प्रभावित’ म्हणून घोषित केले आहेत.

निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी सर्व तहसीलदारांना आपदग्रस्त व बाधितांची यादी उपलब्ध करून, या सवलतींची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.


Back to top button
Don`t copy text!