दैनिक स्थैर्य । दि.२४ जानेवारी २०२२ । फलटण । शहरातील गजानन चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा तातडीने न बसवल्यास दि.26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी गजानन चौक येथे आमरण उपोषणास सुरुवात करणार असल्याचा इशारा फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सचिन बेडके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र बेडके, कार्याध्यक्ष अमीरभाई शेख, उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, शहराध्यक्ष पंकज पवार, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रीतम जगदाळे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष ताजुद्दीन बागवान, शहराध्यक्ष अल्ताप पठाण यांनी निवेदनाद्वारे फलटण नगरपरिषदेला दिला आहे.
याबाबत मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशी दिनांक 2 ऑक्टोबर रोजी फलटण नगरपालिकेने नूतनीकरणासाठी काढलेला महात्मा गांधींचा पुतळा त्वरित बसविण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी राष्टीय काँग्रेसच्या पदाधिकारी यांना दिले होते. मात्र अद्याप पुतळा बसविण्याबाबत काहीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींच्या पुतळ्याला च्या जागेजवळ आमरण उपोषणास प्रारंभ करण्यात येणार आहे.