दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील २०२३ ची कोतवाल भरती अंतिम निवड सूची बुधवार, ९ ऑगस्ट २०२३ रोजी जाहीर झाली आहे, अशी माहिती कोतवाल निवड समिती सदस्य तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली.
तालुक्यातील १७ पैकी १४ रिक्त सजातील कोतवाल पदांसाठी ही भरती झाली होती. ६ ऑगस्ट रोजी झालेल्या परीक्षेनंतर मूळ कागदपत्रे पडताळणीनंतर बुधवार, ९ ऑगस्ट रोजी अंतिम निवड यादी जाहीर झाली. त्यापैकी सर्वाधिक गुण मिळविणार्या उमेदवारांना १० ऑगस्ट रोजी नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय शासनाच्या नियमाप्रमाणे गुणवत्तेनुसार प्रत्येक सजातील पुढील २ उमेदवारांना प्रतिक्षाधीन यादीत ठेवण्यात आले आहे. ही निवड १ वर्ष कालावधीकरीता वैध राहणार असून नियुक्त झालेला उमेदवार रुजू न झाल्यास अथवा त्याने १ वर्षाच्या आत राजीनामा दिल्यास अथवा या कालावधीत तो काही कारणाने पदासाठी अपात्र ठरल्यास यादीतील पुढील उमेदवारास संधी दिली जाईल.
गोखळी येथे अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण होते. तेथे केवळ एक उमेदवारी अर्ज दाखल झाला. तोही अपात्र ठरल्याने ही जागा रिक्त राहिली आहे. धूळदेव येथे एकूण चार उमेदवारांना समान गुण मिळाले होते. येथे शासनाच्या नियमाप्रमाणे वयाने सर्वात ज्येष्ठ असणार्या उमेदवाराची निवड कोतवाल पदी करण्यात आली आहे. पुढील २ उमेदवार हे प्रतीक्षाधीन यादीत समाविष्ट झाले आहेत.
१२ गावातील सजानिहाय कोतवाल म्हणून नियुक्त झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.
गिरवी – विवेक अतुलराज निकाळजे
साठे – सिद्धार्थ सखाराम मोरे
गुणवरे – कल्याणी अमोल खरात
वाठार निंबाळकर – कविता अमर जगताप
होळ – हारुण नजीर मुजावर
कुसूर – सूरज सुभाष नरुटे
राजुरी – काजल वैभव पवार
हिंगणगाव – नामदेव माधव शिंदे
तरडगाव – अक्षय चंद्रकांत गायकवाड
वडले – कोमल शामराव खताळ
खामगाव – सीमा नीलेश भोसले
तडवळे – लक्ष्मण रत्नसिंह खराडे