
स्थैर्य, फलटण, दि. 28 : फलटण येथील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासन/प्रशासनाने केलेल्या उपाय योजना निश्चित योग्य दिशेने सुरु आहेत, आता येथील 50 खाटांचे उप जिल्हा रुग्णालयात त्यादृष्टीने आवश्यक सुधारणा करुन आय.सी.यू. सह व आवश्यक साधन सामुग्रीसह हे रुग्णालय करोना उपचार रुग्णालय म्हणून सर्वार्थाने उभे करण्याची नितांत आवश्यकता असून त्यासाठी प्राधान्याने प्रयत्न झाले पाहिजेत.
वाढत्या रुग्ण संख्येचा विचार व्हावा
फलटण शहर व तालुक्यात आतापर्यंत करोना बाधीत रुग्णांची संख्या मर्यादित होती, अजूनही त्याचे प्रमाण फार वाढले नाही, तथापी पुणे मुंबई व अन्य शहरी भागातून मोठ्या संख्येने दाखल झालेल्या, अजूनही होत असलेल्या आपल्याच लोकांमुळे रुग्ण संख्या इतर तालुक्यांप्रमाणे येथेही वाढताना दिसत असल्याने भविष्यात वाढणार्या संभाव्य रुग्ण संख्येचा विचार करुन उप जिल्हा रुग्णालय सक्षम करोना उपचार रुग्णालय म्हणून उभे करण्याची गरज सर्वांनीच प्राधान्याने विचारात घेतली पाहिजे.
फलटणकरांना तातडीने उपचाराची जवळ सुविधा नाही
सातारा जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत फलटण तालुका हा जिल्हा मुख्यालयापासून काहीसा दूर आणि जिल्ह्यातील रुग्णालया पर्यंत तातडीने पोहोचता येण्यासारखा नसल्याने येथे करोना उपचारासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची नितांत आवश्यकता आहे, त्यासाठी उप जिल्हा रुग्णालयाचा विचार झाला पाहिजे.
शहरात मोजकी हॉस्पिटल अलीकडे उभी राहिली
फलटण शहर व तालुक्यातील रहिवाशांसाठी करोना शिवाय अन्य आजारांबाबत फलटणकर आतापर्यंत पुणे शहराला जवळ करीत असत अलीकडे लोकवस्ती वाढत असताना शहरात काही मोजकी हॉस्पिटल्स उभी राहिल्याने पुणे जवळ करणे कमी झाले असले तरी अद्याप पुण्याहुन येणार्या तज्ञ डॉक्टरांचा राबता येथे सुरु आहे, करोना शिवाय अन्य आजाराचे रुग्ण येथे मोठया संख्येने असूनही येथील उपलब्ध हॉस्पिटल्स पुरेशी नाहीत, त्या पार्श्वभूमीवर येथील खाजगी हॉस्पिटल्स करोना उपचारासाठी पुढे आली तर अन्य आजाराच्या रुग्णांबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचा धोका आहे, येथील खाजगी रुग्णालयात गंभीर आजाराचे रुग्ण संख्या मोठी असल्याने त्यांना वार्यावर सोडून समाजकार्यासाठी शहरातील काही डॉक्टर मंडळी आपली रुग्णालये करोना उपचारासाठी उपलब्ध करुन देण्यास किंवा काही डॉक्टर्स अशा रुग्णालयासाठी स्वतःची सेवा देण्याच्या विचारात असल्याचे समजते, शासनाने शहरातील कोणतेही हॉस्पिटल करोना उपचारासाठी उपलब्ध करुन न देता त्यांना त्यांचे नेहमीचे रुग्ण सांभाळण्यास स्पष्ट पणे बजावून उप जिल्हा रुग्णालय सक्षमपणे उभे करुन तेथे करोना रुग्णासाठी सर्व उपचाराची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी होत आहे.
अन्य तालुक्यांप्रमाणे फलटणचे शासकीय रुग्णालय करोना उपचारासाठी आवश्यक
शासनाने सातारा जिल्ह्यात अन्य तालुक्यातील शासकीय रुग्णालये ज्याप्रमाणे करोना उपचारासाठी सर्व साधने, सुविधा उपलब्ध करुन देऊन करोना उपचारासाठी सज्ज करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याप्रमाणे फलटण उप जिल्हा रुग्णालय सर्व साधने सुविधांनी सुसज्ज करावे, गरज वाटल्यास येथील खाजगी डॉक्टरांना उप जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी पाचारण करुन त्यांना समाजसेवेची संधी द्यावी, तसे करताना नियमानुसार त्यांनाही काही कालावधीची ड्युटी केल्यानंतर होम क्वारंटाइन आणि नंतरच स्वतःचे हॉस्पिटल पाहण्याची मुभा देता येईल याचाही विचार करावा लागेल.
तातडीच्या करोना उपचारासाठी खाजगी रुग्णालये नकोत
आतापर्यंत मालोजीराजे शेती विद्यालय कॉम्प्लेक्स मध्ये केवळ करोना संशयीत रुग्ण ठेवले जात आता पॉझीटीव्ह रिपोर्ट आहे, परंतू लक्षणे नाहीत असे काही रुग्ण येथे दाखल केले जात आहेत, या रुग्ण संख्येत वाढ झाल्यास तातडीने उपचारासाठी आज येथे सुविधा उपलब्ध नसल्याने तातडीने खाजगी रुग्णालय जवळ केले गेले तर तेथील अन्य रुग्णांची कुचंबना होण्याचा धोका असल्याने सर्व दृष्टीने उप जिल्हा रुग्णालय सक्षम करणे हा उपयुक्त निर्णय ठरेल, लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासनाने त्यादृष्टीने विचार करुन त्वरित निर्णय करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.