
फलटण नगरपरिषदेच्या पुतळा नूतनीकरण कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा अशोकराव जाधवांचा आरोप. उमेदवार पांडुरंग गुंजवटे यांच्यावर संशय व्यक्त.
स्थैर्य, फलटण, दि. १८ डिसेंबर : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत महापुरुषांच्या पुतळा नूतनीकरणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सन २०१६ पासून शहरात उभारण्यात आलेल्या आणि नूतनीकरण केलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांच्या कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी राजे गट आणि संबंधित उमेदवारावर केला आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान बोलताना अशोकराव जाधव यांनी राजे गटाच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “विकास आणि सन्मानाच्या नावाखाली प्रत्यक्षात शहराची लूट करण्यात आली आहे. पुतळ्यांच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असूनही बिले मात्र फुगवून काढण्यात आली. हा प्रकार महापुरुषांच्या सन्मानाशी खेळण्याचा आहे.”
पांडुरंग गुंजवटेंवर थेट निशाणा
जाधव यांनी प्रभाग क्रमांक ७ मधील उमेदवार आणि स्वीकृत नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांचे नाव घेत थेट आरोप केले.
“राजे गटाच्या पाठबळावर गुंजवटे यांनी या कामांतून कोटींची माया जमवली आहे. महापुरुषांचे नाव वापरून स्वतःच्या तिजोऱ्या भरण्याचे काम काही लोकांनी केले असून, हा भ्रष्टाचार जनता सहन करणार नाही,” असे जाधव यांनी स्पष्ट केले.
निकृष्ट काम आणि वाढीव बिले
पुतळ्यांच्या नूतनीकरणासाठी आलेला निधी योग्य कामासाठी न वापरता त्यात गैरव्यवहार झाल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. “कामाचा दर्जा सुमार असतानाही मोठी बिले मंजूर करून घेतली गेली. या भ्रष्ट साखळीत कोणाकोणाचे हितसंबंध आहेत, हे जनतेसमोर येत आहे,” असेही जाधव यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
जनतेमध्ये संतापाची लाट
महापुरुषांच्या स्मारकांचा वापर भ्रष्टाचारासाठी झाल्याने जनसामान्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. राजे गटाच्या कारभारावर जनतेचा विश्वास उडाला असून, याचे पडसाद आगामी मतदानात नक्कीच उमटतील, असा इशारा अशोकराव जाधव यांनी दिला आहे. हा मुद्दा प्रचारात केंद्रस्थानी असल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
