दैनिक स्थैर्य । दि. २७ ऑगस्ट २०२२ । फलटण । फलटण शहरातील एसटी स्टँडची दुरावस्थेची समस्या अंदाजे पाच वर्षांपासुन फलटण तालुक्यातील जनता सहन करत आहे. पुर्णपणे तिथे चिखलाचे साम्राज्य, चिखलातील घसरगुंडीने होणारे अपघात, अस्वच्छता, धुळ, आदी समस्यांनी फलटण तालुक्यातील जनता अक्षरशः मेटाकुटीस आलेली आहे. फलटण तालुक्यातील नागरिकांच्या आलेल्या तक्रारीनंतर फलटण बसस्थानकाच्या कामाला लागत असलेल्या दिरंगाईबाबत जाब विचारण्यासाठी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी फलटण आगार व्यवस्थापक राहुल नाईक यांच्या कार्यालयास भेट दिली व एसटी स्टँडच्या आवारातील सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.
सातारा जिल्हा परिवहन कार्यालयाकडून याबाबत माहिती घेतली असता महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाकडून दिनांक 24/05/2019 रोजी सिनर्जी स्काय इन्फ्रा डेव्हलपमेंट या कंपनीला फलटण बसस्थानकातील सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाचा ठेका देण्यात आला होता व सदर काम बारा महिन्यात पुर्ण करण्याची अट वर्क ऑर्डरमध्ये घालण्यात आली होती. परंतु ऑगस्ट 2022 मध्येही सदर काम पुर्ण का झाले नाही यावर सर्व शिवसैनिकांनी विचारणा करुन संबंधित ठेकेदारास सदर काम पुर्ण झाल्यानंतर काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. तसेच एसटी स्टँड सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम जलदगतीने अखंडपणे चालू रहावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आक्रमक आंदोलन हाती घेण्याचा इशारा दिल्यामुळे सातारा जिल्हा परिवहन कार्यालयाकडून सदर काम सप्टेंबर 2022 महिनाअखेर पर्यंत पुर्ण करुन देण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले. तसेच फलटण तालुका व सातारा जिल्हा एसटी परिवहन महामंडळ कार्यालयाने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचेसह, शिवसेना उपतालुका प्रमुख अभिजीत कदम, ग्राहक संरक्षण कक्षाचे माजी सातारा जिल्हाप्रमुख शैलेंद्र नलवडे, विभाग प्रमुख किसन यादव, माथाडी कामगार तालुका प्रमुख नंदकुमार काकडे, ग्राहक संरक्षण कक्षाचे उप शहर प्रमुख भारतशेठ लोहाना, अक्षय तावरे, मंगेश खंदारे, राजाभाऊ इप्ते, वैभव भोसले, नवनाथ पवार, आदी शिवसैनिक उपस्थितीत होते.