

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी (SSC) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, फलटण तालुक्याचा एकूण निकाल ९२.४४ टक्के इतका लागला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ८ मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यांत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यंदा फलटण तालुक्याचा एकूण निकाल ९२.४४ टक्के इतका लागला असून, निकालात मुलींनीच आघाडी घेतल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
तालुक्यातून यंदा दहावीच्या परीक्षेसाठी एकूण ४००८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये २०७६ मुले आणि १९३२ मुलींचा समावेश होता. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी प्रत्यक्षात ३९९६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
परीक्षेला बसलेल्या ३९९६ विद्यार्थ्यांपैकी एकूण ३६९४ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.४४ टक्के इतकी नोंदवली गेली आहे.
या निकालात विद्यार्थीनिहाय आकडेवारी पाहिली असता, परीक्षेस बसलेल्या २०६९ मुलांपैकी १८६४ मुले उत्तीर्ण झाली आहेत. तर, १९२७ मुलींपैकी १८३० मुलींनी घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे उत्तीर्णतेच्या प्रमाणात मुलांपेक्षा मुलींची टक्केवारी अधिक असल्याचे दिसून येत आहे.