
दैनिक स्थैर्य । दि. १५ जुलै २०२१ । फलटण । काळाच्या पडद्याआड गेलेले कपाशी पिक गेल्या 4/5 वर्षांपासून पुन्हा जोर धरु लागले असून हळूहळू कपाशी लागवडीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यापूर्वी उन्हाळ्यात घेतले जाणारे कापूस पीक आता पावसाळ्यात घेतले जात आहे. गतवर्षी कपाशी पिकास पाच ते साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, यावर्षी दर वाढवून मिळेल या अपेक्षेने कपाशी पिक लागवडीत वाढ होत आहे. तथापी, या भागात शासकीय कापूस खरेदी केंद्र नसल्याने परजिल्ह्यातील खाजगी व्यापारी शासकीय दरापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे शासकीय हमी भाव कापूस खरेदी केंद्र सुरु करावीत अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
शेतकरी पांढरे सोने संबोधीत असलेल्या कापसाचे पिक 30-35 वर्षांपूर्वी फलटण तालुक्यात भागात मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादनामुळे फलटण, बरड, आसू, खटकेवस्ती येथे शासकीय कापूस खरेदी केंद्र आणि प्रक्रिया उद्योग (जिनिंग फॅक्टरी) सुरु करण्यात आले होते. त्यातून शेतकरी ऊसाबरोबर कापूस या नगदी पिकातून आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला होता. मात्र पिकावरील वाढत्या किडीच्या प्रादुर्भावाने उत्पादन घटू लागले व परिणामी जिनिग बंद पडल्या त्या अद्याप बंदच आहेत. या सर्व कारणांमुळा कालांतराने तालुक्यातून कपाशी पिक पूर्णपणे नामशेष झाले.
4/5 महिन्यात चांगला पैसा मिळवून देणारे आणि शेत जमीनीसाठी बेवड चांगला असतो म्हणून या पिकाकडे शेतकर्यांचा कल दिसून येत आहे. कपाशी लागवड झाल्या पासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी वर्गाला घोर लागली होती. मात्र गेल्या दोन – तीन दिवसात झालेल्या पावसामुळे शेतकर्याला दिलासा मिळाला आहे. या भागातील कापसाच्या क्षेत्रात होणारी वाढ शासनाच्या निदर्शनास आणून देत फलटण तालुक्यात पूर्वीप्रमाणे कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी आ. दीपक चव्हाण यांनी केल्यानंतर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी होकार दिला होता. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या माध्यमातून लवकरच कापूस खरेदी केंद्र सुरु होतील, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे.