
स्थैर्य, फलटण, दि. ३० सप्टेंबर : फलटण येथे ‘वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय’ स्थापन करण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक असलेली नवीन पदे निर्माण करणे आणि त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीसही मान्यता देण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे फलटणच्या जनतेला व वकिलांना मोठा फायदा होणार असून, अनेक प्रकरणांसाठी सातारा येथे जावे लागणारे हेलपाटे आता थांबणार आहेत.
सदरील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय फलटण येथे स्थापन व्हावे, यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने मागणी केली होती. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
मागील वर्षीच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे फलटण येथे जिल्हा न्यायालय सुरू करण्यात आले होते. त्यानंतर आता वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय देखील मंजूर झाल्याने, फलटणच्या न्यायिक क्षेत्रात मोठी सोय उपलब्ध झाली आहे.