फलटण – सातारा मार्ग होणार सिमेंट काँक्रीटचा; बाणगंगा पुलाचे काम गतीमान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१७ फेब्रुवारी २०२१ । फलटण । फलटण – सातारा मार्गावरील फलटण शहरालगत बाणगंगा नदीवरील पूल रुंदीकरण व मजबुतीकरण कामासाठी दि. १० फेब्रुवारी पासून सुमारे २ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीसाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीला बंद करण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी या मार्गावरील वाहतुक फलटण – लोणंद मार्गाने वडजल अथवा निंभोरे मार्गे सातारा कडे वळविण्याचे निर्देश दिल्याने तावडी, फरांदवाडी, ठाकुरकी, नगर परिषद हद्दीत मोडणारे हनुमान नगर वगैरे भागातील विद्यार्थी/विद्यार्थिनी, दूध व भाजीपाला विक्रेते, छोटे व्यावसाईक, नोकरदार या सर्वांचीच लांबच्या रस्त्याने जाण्या येण्याच्या मार्गामुळे मोठी कुचंबना झाली होती.

या सर्वांची ही अडचण लक्षात घेऊन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता मोहन खोसे व जिल्हा परिषद बांधकाम फलटण उपविभागाचे उपअभियंता सुनिल गरुड यांच्याशी चर्चा करुन रंगारी महादेव मंदिर, श्रीकृष्ण मंदिर पिछाडीने, बाणगंगा नदीतून वीट भट्टया मार्गे हनुमान नगर व तेथून पुन्हा फलटण – सातारा रस्ता या जवळच्या मार्गाचे सर्वेक्षण व किरकोळ दुरुस्त्या करुन सदरचा मार्ग पर्यायी मार्ग म्हणून उपलब्ध करुन दिल्याने या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.

वीट भट्टयांची माती व अनेक वर्षे वापरात नसल्याने या मार्गावर धुळीचा प्रचंड त्रास वाहन धारकांना होत असल्याने सगुणामाता कन्स्ट्रक्शन आणि शासकीय व नगर परिषद यंत्रणेमार्फत रस्त्यावरील धूळ कमी करुन नियमीत पाणी मारण्याची व्यवस्था करण्यात आल्याने आता धुळीचा त्रास कमी झाला आहे.

दरम्यान, सुमारे ५०/६० वर्षांपूर्वी शहरालगत बाणगंगा नदीवर बांधलेल्या पुलाचे रुंदीकरण वाढत्या वाहतुकीसाठी आवश्यक असल्याने या जुन्या पुलाशेजारी दक्षिणेकडे तेवढ्याच लांबी रुंदीचा आणखी एक पूल उभारुन रस्ता रुंदीचा प्रस्ताव मार्च २०१७ मध्ये मंजूर करण्यात आला असून त्यासाठी सुमारे ७ कोटी रुपये खर्चास सार्वजनिक बांधकाम विभागाकडील शासन निर्णयानुसार देण्यात आली.

त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन मे. ईगल कन्स्ट्रक्शन, फलटण यांना दि. १३ सप्टेंबर २०१९ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. ९.१० मी. चे ११ गाळे म्हणजे एकूण १००.१० मी. लांब आणि ७.५० मी. वाहतूक मार्ग अशा रुंदीचा हा सध्याच्या पुलाला समांतर पूल उभारण्यात येत आहे. त्यासाठी ३ कोटी २९ लाख ५२ हजार रुपये तर जोड रस्ते, संरक्षक भिंतीच्या बाजूने भराव, सातारा बाजुकडे १८० मीटर व फलटण बाजूकडे ५० मीटर संरक्षक भिंत, भराव, जोडरस्ते, ९ मीटर रुंदीने खडीकरण व डांबरीकरण वगैरे बाबी पूर्ण करण्यात येत आहेत. सद्य स्थितीत पुलाच्या ११ गाळ्यांचे व त्यावरील स्लॅबचे काम पूर्णत्वाच्या अंतीम टप्प्यात आहे.

हा पूल पूर्ण झाल्यानंतर फलटण – सातारा मार्ग सिमेंट काँक्रीटचा होणार असून त्याची मंजुरी व निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता मोहन खोसे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.


Back to top button
Don`t copy text!