
दैनिक स्थैर्य | दि. २८ डिसेंबर २०२४ | फलटण | फलटण येथे ४ व ५ जानेवारी २०२४ या दिवसांमध्ये एक अनोखा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, अभंग, वाद्यवादन, कविता आणि नृत्य यांची मेजवानी चाखायला मिळणार आहे. गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्टस आणि कला प्रसारक संस्था यांच्यातर्फे आयोजित केलेला हा फलटण संस्थान हेरिटेज संगीत महोत्सव मुधोजी हायस्कूल रंगमंच येथे होणार आहे.
शनिवार, दि. ४ जानेवारी सायं. ६.०० ते ९.३० वाजेदरम्यान सनई वादनाचा कार्यक्रम यशवंत जाधव आणि त्यांच्या सहकारी कलाकारांकडून सादर होणार आहे. यावेळी प्रसिद्ध कवी संदीप खरे आणि वैभव जोशी हे कविता वाचन आणि संदीप वैभव यांच्या संगीताचा आनंद घेता येणार आहे. संजय भुजबळ यांचे निवेदन हे कार्यक्रमाचे एक महत्त्वाचे अंग असेल.
रविवार, दि. ५ जानेवारी सायं. ६.०० ते ९.३० वाजेदरम्यान शास्त्रीय गायन, नाट्यगीत, अभंग (मंदार तळणीकर व डॉ. कल्याणी बोंद्रे), गीतरामायण आणि भरतनाट्यम् नृत्यानुभव (अमिता गोडबोले आणि सहकारी) सादर होणार आहे. हा महोत्सव फलटणकरांसाठी एक अनमोल सांस्कृतिक अनुभव असणार आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व कला प्रसारक संस्थेच्या सौ. भाग्यश्री गोसावी यांनी समस्त फलटणकरांना या महोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून अधिक माहितीसाठी ९४०५७४६४१९, ९२२५५२५३५२ येथे संपर्क साधावा.