फलटण: विद्यार्थ्यांनी धम्मसंस्कारांसह शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे – सोमीनाथ घोरपडे


फलटणमधील सोमवार पेठ येथे आयोजित संस्कार वर्गात धम्मसंस्कारांसोबत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत सोमीनाथ घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स्थैर्य, फलटण, दि. 12 जानेवारी : फलटण शहरातील सोमवार पेठ येथे लहान मुला-मुलींसाठी आयोजित संस्कार वर्गात विद्यार्थ्यांनी धम्मसंस्कारांसोबतच आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार सचिव व प्रमुख धम्म प्रचारक सोमीनाथ घोरपडे यांनी केले. धम्म म्हणजे निर्मळ व विवेकशील जीवन जगण्याचा मार्ग असून त्यासाठी उच्च शिक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोमवार पेठ, फलटण येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने लहान बालकांसाठी संस्कार वर्ग उत्साहात संपन्न झाला. या वर्गात मार्गदर्शक म्हणून सोमीनाथ घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना धम्माचे मूलभूत विचार सोप्या व सहज भाषेत समजावून सांगितले.

मार्गदर्शन करताना घोरपडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भगवान बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले आणि संत कबीर यांच्या विचारांचा कसा प्रभाव होता, हे उदाहरणांसह स्पष्ट केले. बाबासाहेबांनी या तिघांना गुरु का मानले, यामागील वैचारिक भूमिका त्यांनी प्रभावीपणे उलगडली.

संत कबीर यांच्या जीवनातील एका प्रसंगाचा संदर्भ देत समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अंधश्रद्धा व रूढी-परंपरांना नकार देत विवेक, तर्क आणि मानवतावादी विचार स्वीकारण्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

या संस्कार वर्गात मुलांना सुत्त पठण, वंदना तसेच भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी गोष्टी सांगण्यात आल्या. या उपक्रमातून नैतिक मूल्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावादी विचार रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हा संस्कार वर्ग भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचे कार्यालयीन सचिव आयुष्यमान चंद्रकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांच्या आग्रहास्तव सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमासाठी प्रदीप खरात, विशाल शिंदे, विकी भोसले, प्रकाश शिलवंत व वाघमारे परिवार यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच शिंदे परिवार, खरात परिवार आणि सोमवार पेठ परिसरातील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या संस्कार वर्गामुळे परिसरातील पालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, भविष्यातही असे संस्कारात्मक व धम्मप्रेरित उपक्रम नियमितपणे राबविण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे.


Back to top button
Don`t copy text!