मयताची ओळख पटवून खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यशस्वी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : फलटण-पंढरपूर रोडवर निंबळक, ता. फलटण गावचे हद्दीत बनकर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विहिरीत दि. १ जुलै रोजी आढळलेल्या अनोळखी स्त्री जातीच्या मयताची ओळख पटवून खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात व मयत मुलीच्या संशयीत मेहुण्यास ताब्यात घेण्यात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत बरड पोलीस दूरक्षेत्राचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यशस्वी झाले आहेत.

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ जुलै रोजी बनकर वस्तीकडे जाणाऱ्या रोडवर दत्तात्रय ढमाळ यांच्या विहिरीत अनोळखी मृतदेह चादरीमध्ये गुंडाळलेल्या स्थितीत आढळून आला होता. त्यावेळी अनोळखी असा पंचनामा करण्यात आला मात्र पोलिसांनी सिटीझन पोर्टल ॲपद्वारे सी.सी.टी.एन.एस. प्रणालीच्या सहाय्याने सातारा, सांगली, सोलापूर, पुणे जिल्ह्यात दाखल असणारे हरवलेल्या मुलिंच्या गुन्ह्यांची माहिती पडताळणी करताना कडेगाव जि. सांगली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंग मधील मुलगी भाग्यश्री उर्फ पूजा दयानंद गायकवाड वय १९ वर्षे रा. खेराडी, ता. कडेगाव, जि. सांगली या घटनेतील मुलीच्या वर्णनाशी अनोळखी म्हणून सापडलेल्या मयत मुलीच्या वर्णनाशी जुळत असल्याने सदर मिसिंग मुलीचे वडील दयानंद आत्माराम गायकवाड, आई मालन दयानंद गायकवाड दोघे रा. खेराडी, ता. कडेगाव यांना बोलावून घेऊन अनोळखी मुलीचे अंगावरील कपडे, तिची वापरती अंगठी, फोटो दाखविल्यानंतर आई वडिलांनी सदर कपडे, अंगठी, फोटो पाहुन सदर अनोळखी मयत आपली मुलगी भाग्यश्री दयानंद गायकवाड असल्याचे सांगितले.

त्यानंतर त्यांना मुलीचे बाबत कोणावर संशय आहे किंवा कसे याबाबत विचारणा केल्यावर त्याबाबत नकार दिला मात्र गिरवी, ता. फलटण येथे आपले जावई राहण्यास असल्याचे सांगितले. त्यानुसार तपासी अधिकारी संजय बोबले व इतर अधिकारी कर्मचारी यांनी गिरवी ता. फलटण येथे जाऊन जावई यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे या घटनेबाबत चौकशी केली असता प्रारंभी अनभिज्ञता व्यक्त केली परंतू माहिती घेत राहिल्यावर अखेर त्याने सदर मुलगी आपली मेहुणी होती. दोघात प्रेम संबंध असल्याने तिने लग्न करण्याचा हट्ट धरला व आपण लग्न करण्याच्या विचारात नसल्याचे सांगितले. दि. २९ जून रोजी सदर मुलगी गिरवी येथे भेटण्यास आल्यावर सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास मोटार सायकलवर बसवून गिरवी, दुधेबावी, वडले मार्गाने निंबळक ता. फलटण गावचे हद्दीत बनकर वस्ती येथे ऊसाचे शेतात नेऊन तेथे गळा व तोंड दाबून खून केला, रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तिचा मृतदेह चादरीत गुंडाळून ऊसाचे शेतात टाकून दिले. दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास रस्त्याने कोणी येत नाही असे बघून मयत मेहुणी भाग्यश्री गायकवाड हिचा मृतदेह ऊसाचे शेतातून आणून रस्त्याकडेला असलेल्या विहिरीचे शेजारी पाण्यात टाकून दिल्याचे त्याने कबूल केले, त्यास ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास संजय बोबले करीत आहेत.

जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एक महिन्याच्या आत सदर गुन्ह्याचा तपास लावून संशयितास ताब्यात घेण्यात यशस्वी झाल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!