स्थैर्य, फलटण, दि.५ : ताथवडा घाटामध्ये नियमित पेट्रोलिंग करत असताना फलटण ग्रामीण पोलिसांना ताथवडा घाटामधील दुसऱ्या वळणाजवळ सहा जण संशयित्या थांबल्याचे आढळून आले. सदरील इसमांना फलटण ग्रामीण पोलिसांनी दोन्ही बाजूंनी घेरले असता त्यामधील दोघा जणांना पळून जाण्यामध्ये यश आलेले आहे. ताथवडा गावाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या ताथवडा घाटामध्ये दरोडा टाकून सुमारे 80 हजार रुपये व हत्यारे ही त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली आहेत व चौघा जणांना जेलबंद करण्यात आलेले आहे, अशी माहिती फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश बाजीराव मदने, राजापूर, ता. खटाव, जि. सातारा, सनी उर्फ सोन्या धनाजी भूलकर, रा. चौधरवाडी, ता. फलटण, प्रथमेश उर्फ सोनू हनुमंत मदने, रा. उपळवे ता. फलटण, किशोर हनुमंत जाधव, रा. ताथवडा, ता. फलटण व पळून गेलेले इसम महेश उर्फ दत्तात्रय शिरतोडे, रा. मोती चौक, फलटण, किरण मदने रा. राजापूर ता. खटाव जि. सातारा असे एकूण सहा जण मिळून ताथवडा घाटामध्ये दरोडा टाकत होते. त्यांच्याकडून 80 हजार रुपयांचा माल व जवळ असलेली सर्व हत्यारे जप्त करण्यात आलेली आहेत. ताथवडा घाटामध्ये असणाऱ्या रस्त्यावर ये-जा करणार्या माणसांवर दरोडा घालण्याच्या तयारीनिशी सदरील सहा जण एकत्र मिळून आले. व छाप्याच्या वेळी दोघे जण पळून गेले तर चौघांना जागीच पकडले आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
सदरची कामगिरीही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधीक्षक तानाजी बरडे, फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक बोंबले, पोलीस उपनिरीक्षक शेख, पोलीस नाईक देवकर, तुपे चालक यादव, पोलीस कॉन्स्टेबल कुंभार, पोलीस नाईक काशीद, पोलीस कॉन्स्टेबल जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल पाटोळे यांनी केलेली आहे.