
स्थैर्य, फलटण, दि. ५ ऑक्टोबर : येथील रहिवासी असलेल्या पिंकी चैतन्य पवार यांना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून ३ लाख ९० हजार रुपयांची वैद्यकीय मदत मिळाली आहे. या मदतीमुळे त्यांच्यावरील मोठ्या शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.
पिंकी पवार (वय २६) यांच्यावर पुण्यातील बाणेर रोड येथील ए.वाय.एम.एस. रुग्णालयात एक मोठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. या उपचारासाठी रुग्णालयाचे एकूण बिल ४ लाख ४० हजार रुपये झाले होते. पवार कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने एवढा मोठा खर्च उचलणे त्यांना शक्य नव्हते.
या परिस्थितीत, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वैद्यकीय मदत कक्षाशी संपर्क साधण्यात आला. कक्षाच्या ‘आरोग्य सेवकां’नी रुग्णालय प्रशासनाशी संवाद साधून पवार यांच्या परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर रुग्णालयाच्या प्रस्तावानुसार पवार यांच्या बिलामध्ये ३ लाख ९० हजार रुपयांची सवलत निश्चित करण्यात आली, ज्यामुळे पवार कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.