
दैनिक स्थैर्य | दि. 02 एप्रिल 2025 | फलटण | सातारा जिल्ह्यातील फलटण येथील मुधोजी मनमोहन राजवाडा हे इतिहास प्रेमींसाठी एक महत्त्वपूर्ण स्थळ आहे. फलटण तालुका ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला एक प्राचीन शहर आहे, जेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेबांच्या माहेरचा राजवाडा आहे. या राजवाड्याला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सदिच्छा भेट दिली आणि त्यांनी आजच्या काळात राजवाड्यांचे संरक्षण करण्याचे महत्त्व व्यक्त केले.
फलटण हे संस्थान म्हणून ओळखले जाते आणि येथील मुधोजी मनमोहन राजवाडा ही वास्तू त्याच्या ऐतिहासिक वास्तुकलेचा उत्तम असा नमुना आहे. श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ म्हणूनही हा राजवाडा प्रसिद्ध आहे. या राजवाड्याच्या माध्यमातून फलटणचा इतिहास इतिहास प्रेमींना सहज उपलब्ध होतो.
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्यासमवेत साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौ. वैशाली कडूकर, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस व फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा हे सर्व मान्यवर या वेळी उपस्थित होते. माजी सभापती आणि युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
फलटणचा हा ऐतिहासिक राजवाडा पाहून विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी महेश ढवळे यांच्याकडून राजवाड्याची माहिती घेऊन सर्व प्रमुख स्थळे पाहिली. हा राजवाडा सध्या दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी प्रसिद्ध आहे, ज्यामुळे याचे महत्त्व निरंतर वाढत आहे.