फलटण: राजे गटाला धक्का; सांगवी, हिंगणगाव, नांदलमधील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश


फलटण तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून सांगवी, हिंगणगाव व नांदल परिसरातील कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला.

स्थैर्य, फलटण, दि. १७ जानेवारी : फलटण तालुक्यातील राजकीय समीकरणांना मोठा धक्का देणारी घडामोड समोर आली असून, विविध गावांतील युवा व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशांमुळे हिंगणगाव जिल्हा परिषद गटासह परिसरातील राजे गटाला हादरा बसल्याचे बोलले जात आहे.

सांगवी, ता. फलटण येथील युवा कार्यकर्ते विराज आनंदराव जगताप यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. युवकांमध्ये सक्रिय असलेले जगताप यांच्या प्रवेशामुळे सांगवी परिसरात भाजपची ताकद वाढल्याचे चित्र आहे.

हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील चांभारवाडी गावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सागर राजेंद्र गोरे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या सामूहिक प्रवेशामुळे राजे गटाच्या स्थानिक ताकदीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

नांदल येथील शंकर गुलदगड, दादा गुलदगड, मारुती यादव, कोंडीबा तरडे, महादेव साळुंखे, वसंत मोहिते, संपत जगदाळे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राजे गटातून भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या वेळी फलटण तालुका मंडल अध्यक्ष विकास उर्फ बापूराव शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगवी, हिंगणगाव व नांदल या तिन्ही भागांतील प्रवेशांमुळे फलटण तालुक्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत झाले असल्याचे चित्र आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.


Back to top button
Don`t copy text!